श्रीधर फडके
लता… झाडाच्या आधारे वाढते ती लता… नाजूक असते ती लता… अवघं आयुष्य आधार देणार्या वृक्षावर अवलंबून असते ती लता… पण लता या शब्दाची ही ज्ञात ओळख बदलून टाकली ती आपल्या लाडक्या लतानं. या लतानं वाढण्यासाठी नक्कीच कोणाचा ना कोणाचा आधार घेतला पण पुढे वस्तुस्थिती अशी झाली पुढे ते लोक तिच्या आधारे वाढले आणि नावारुपाला आले. या लतेचा विस्तार कधीच आपल्या मूळ आधारापुरता सीमित राहिला नाही तर त्याला वेढून दशांगुळे उरला. लता हे असं वादळ होतं की झुळूक, स्वराचा सागर होता की निर्झर, ते क्षितिज होतं की शेजार या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत. पारा दिसतो पण कधीच हातात येत नाही तसाच लताचा स्वर… वर्षानुवर्षे आपण तो ऐकतो, कानात साठवतो हृदयात उतरवतो पण त्याला हात घालण्याची भल्याभल्यांची ताकद नव्हती आणि कधीही असणार नाही. याचं सोपं कारण म्हणजे प्रत्येकाचं स्वरयंत्र विधात्यानं स्वत: बनवलेलं नसतं. दीदींचं स्वरयंत्र जणू असा साकव होता ज्यातून उतरलेल्या प्रत्येक शब्दावर, चालीवर संस्कारांची पखरण होत असे. त्यांचं उच्चारण अर्थाची डूब वाढवून जायचं. लताचा स्वर एकतारीत कधी एकटा पडला नाही तर वाद्यांच्या प्रचंड गोंगाटात कधी हरवून गेला नाही. तो नेहमीच आपली स्वतंत्र ओळख टिकवून राहिला. कारण तो स्वर अगाध होता, अनंत होता. आज दीदींनी देह ठेवला आहे. पण, त्यांच्या स्वराला मरण नाही. भूपाळीपासून अंगाई गीतांपर्यंत आणि विराण्यांपासून प्रेमगीतांपर्यंत तो आपल्याला भेटत राहणार आहे. स्वरांच्या रुपानं दीदी कायमच आपल्यात राहणार आहेत.
काही प्रसंगी शब्द संपतात, ओठावर असले तरी उच्चारणं कठीण होतं आणि परिस्थितीचा मूक स्वीकार करण्याखेरीज आपल्या हाती काहीही रहात नाही. भारतरत्न लता मंगेशकर यांचं या जगाचा निरोप घेऊन जाणं ही अशीच एक घटना आहे. समस्त जगाला दिपवून टाकणारा स्वर आपल्यातून निघून गेला आहे. या स्वरानं जगावर अधिराज्य गाजवलं होतं. हिंदू चित्रसृष्टीवर आपला अमीट ठसा उमटवला होता. खरं तर, या प्रचंड आव्हानात्मक आणि मोठा आवाका असणार्या सृष्टीवर राज्य करणं ही कठीण बाब होती.
पण लतादीदींच्या स्वर्गीय स्वरांची मोहिनी अशी विलक्षण होती की त्यांनी सर्वांनाच मोहित करुन टाकलं. आपण सगळेच त्यांची गाणी ऐकत मोठे झालो आहोत आणि आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची गाणी आपली साथ देणार आहेत. बाबुजींबरोबर त्यांची अनेक गाणी गाजली. दीदी त्यांना फडकेसाहेब म्हणायच्या. ज्योतीकलश झलके… हे त्या दोघांनी अजरामर करुन ठेवलेलं गाणं आजही आपली सकाळ प्रसन्न करुन जातं. अशी असंख्य गाणी आहेत ज्यांचा साधा उल्लेख करायचा झाला तरी कैक तास सरतील. अलीकडे प्रत्यक्ष भेट होत नसली तरी फोनवर मी त्यांच्या संपर्कात होतो. चार महिन्यांपूर्वी आमचं फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी आमच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. दुर्दैवाने तेच आमचं शेवटचं संभाषण ठरलं.
दीदींनी कधीच आपले विचार, आपली मतं, आपली अस्मिताकेंद्रं दडवून ठेवली नाहीत. त्या प्रखर राष्ट्रभक्त होत्या. त्यांची राष्ट्राप्रतीची निष्ठा वेळोवेळी दिसून आली. त्यांची सावरकरनिष्ठाही कधीही लपून राहिली नाही. शिवाजी महाराजांप्रतीचा आदर आणि अपार निष्ठा तर जणू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असल्यासारखी स्थिती होती. या सगळ्यातूनच त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची ओळख होत होती. आता अशी तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्वं बघायला मिळणं, त्यांचे विचार ऐकायला मिळणं अवघड आहे. मध्यंतरीच बाबासाहेब पुरंदरे आपल्याला सोडून गेले. आता दीदी आपल्यात नाहीत. दिवसेंदिवस ही पोकळी वाढतीये असंच आपण म्हणू शकतो. मला दीदींचा स्नेह मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारण्याचा अनेकदा योग आला. बाबूजींबरोबरच किंबहुना त्यांच्या आधी माझ्या आईशी त्यांचा परिचय होता. याच क्षेत्रात असल्यामुळे दोघी एकमेकींना चांगल्या ओळखत होत्या. चाळीसच्या त्या दशकात त्यांचा घनिष्ट संबंध होता. त्या माझ्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. मला अजूनही आठवतंय, त्या दिवशी त्यांचा उपास होता. मात्र उपास सोडून त्यांनी भोजन घेतलं होतं. आता त्या फक्त आठवणी राहिल्या आहेत. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी माझं एखादं गाणं म्हणावं, ही इच्छा अखेरपर्यंत अपूर्णच राहिली. पण, तरीही त्यांच्या असंख्य गाण्यांनी मला समृद्ध केलं. त्यांचे जगावर अपरिमीत उपकार आहेत. त्याचं स्मरण ठेवणंच आता आपल्या हातात आहे.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाबुजींची अनेक सुंदर गाणी लतादीदींनी अप्रतिम स्वरांद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवली. सजनी या चित्रपटातलं किस्मत का नही दोष सावरे, दोष नही इन्सानका हे गाणं दीदींनी बाबूजींबरोबर गायलं. रत्नघर हा बाबूजींचा चित्रपट. त्यातली अप्रतिम गाणी दीदींनी आपल्या सुरांनी आणखी फुलवली. पण काही कारणानं हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. बांध प्रित फुलोरा सारखी गोड गाणी लतादीदींच्या स्वरांनी आणखी अवीट ठरवली. शेवग्याच्या शेंगा या चित्रपटातलं इच्छा देवाची सुख देवासी मागावे हे गाणं अविस्मरणीय ठरलं. लतादीदी गाण्यासाठी उभ्या राहिल्या की रसिकांना साक्षात ईश्वरीशक्तीचा अनुभव येत असे. त्यांनी आपलं तेज स्वकर्तृत्वानं प्रकट केलं. स्वररत्न पुरस्कार मिळाला त्यावेळी लतादीदी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, फडकेसाहेबांची अनेक सुंदर गाणी मी गायली आहेत. आता श्रीधरचं गाणं गायला आवडे. ही विनयशीलता नतमस्तक करायला लावणारी होती. लतादीदी संगीतकार सांगेल तसं गायच्या. एवढंच नव्हे, तर काही वेळा त्यात बदलही सुचवायच्या.
त्यांच्या गायनातल्या जागा कळीदार असायच्या. शास्त्रीय संगीत असो वा भावगीत, प्रेमगीत असो वा विरहगीत त्यांच्या सुरावटीतून तो तो भाव नेमकेपणानं प्रतित होत असे. आवाजातलं इतकं वैविध्य क्वचितच पहायला मिळतं. आपल्या स्वरांच्या शक्तीनं, गायकीनं लतादीदींनी चित्रपटसृष्टीवर सुरांचं राज्य निर्माण केलं. म्हणूनच आता हे राज्य उदास, ओसाड झाल्याची भावना आणि त्याची तीव्र वेदना दाटून येत आहे. दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.