मुरूडच्या किनारी विद्यार्थ्यांचे थवे

राज्यभरात शैक्षणिक सहलींचा फिवर
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
कोरोनामुक्त वातावरण असल्याने रायगडातील समुद्रकिनारी पश्‍चिम महाराष्ट्र, पुणे आदी परिसरातीलच नव्हे तर नाशिक, बीड, अकोला, धुळे, नगर, श्रीरामपूर, जळगाव आणि खानदेशमधून शैक्षणिक सहलींचा महापूर मोठ्या प्रमाणावर रायगडच्या समुद्रकिनारी आलेला दिसत आहे. याचे प्रमाण वाढते राहणार असल्याची माहिती गुरुवारी मुरूड समुद्रकिनारी नाशिक येथून आलेल्या शिक्षक आयोजकांनी बोलताना दिली. मुरूड समुद्रकिनारी तर विद्यार्थ्यांचे थवेच्या थवे दिसून येत असून, सर्वजण मुक्तपणे समुद्र दर्शन आणि फिरण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसून आले. एसटी बसेस भरून समुद्रकिनारी दररोज दाखल होताना दिसत आहेत.शुक्रवारी सकाळपासून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

मुरूड जंजिरा तालुका समुद्रकिनारा या स्थळाला या मध्ये मोठया प्रमाणावर सहलींचे विशेष प्राधान्य असल्याचे गेल्या 15 दिवसात दिसून आले आहे. सिन्नर तालुक्यातील सोनआंबे माध्यमिक शाळेचे शिक्षक एन.पी. माळी यांनी सांगितले की, एकट्या आमच्या शाळेतील किमान 8 ते 10 बसेस मुरूड येथे आल्या आहेत. मुरूडचा समुद्रकिनारा सुरक्षित आणि निसर्गरम्य असल्याने शैक्षणिक सहलीसाठी प्राधान्याने विचार केला जातोय.

रायगड जिल्ह्यातील जे सुरक्षित आणि सुंदर समुद्र किनारे आहेत त्यांचे महत्त्व भविष्यात वाढते राहणार यात शंकाच नाही. तथापि, ऐतिहासिक आणि समुद्रकिनारी वसलेला मुरूड तालुका पर्यटनाचा हब होऊ शकतो, असे मत अकोला, सिंदखेडा, खानदेश, नगर येथून आलेल्या शिक्षक आयोजकांनी व्यक्त केले. बहुसंख्य शैक्षणिक सहलीची सुरुवात साळाव येथील विक्रम बिर्ला गणेश मंदिर पाहून करण्यात येत आहे. काशीद, नांदगाव, बारशिव रॉक बीच भेटी देऊन या सहली सायंकाळी मुरूड बीचवर येताना दिसून येत आहेत. वेळेनुसार शक्य झाल्यास यातील काही सहली जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी जात आहेत. मात्र, सर्वांना वेळेअभावी आणि तांत्रिक कारणास्तव जंजिरा पाहणे शक्य नसल्याचे दिसत आहे. मुरूडमध्ये सहलीतील विद्यार्थी, विद्यार्थिनींची राहण्याची उत्तम व्यवस्था होत असल्यानेदेखील ओघ वाढता आहे. नांदगाव येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन सहली पुढे मार्गस्थ होत आहेत.

भविष्यात होऊ घातलेला सागरी महामार्ग मुरूड परिसरातून जाणार असून, मुरूडचा पर्यटन विकास आराखड्यात शासनाने समावेश केलेला आहे. त्यामुळे मुरूड परिसर प्रकर्षाने अधिक उजळून निघेल, यात शंकाच नाही. मुरूडसहित रायगडचे समुद्रकिनारे रम्य आणि विलोभनीय असल्याने अनेकांना भुरळ पडणे साहजिकच आहे. 540 कि.मी.चा प्रास्ताविक सागरी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर राज्यातील विविध भागांतील पर्यटक आणि शैक्षणिक सहली अधिक प्रचंड प्रमाणावर या भागात भेटी देतील, असे चित्र आताच स्पष्टपणे दिसून येऊ लागले आहे.

Exit mobile version