स्वेटर विक्रेते शहरात दाखल

| पनवेल | वार्ताहर |

अवकाळी पावसामुळे हवेतील गारवा अधिकच वाढला आहे. तीन दिवसांपासून वातावरणातील बदलांना पनवेलकर सामोरे जात आहेत. मात्र, अजूनही शहरात हुडहुडी भरवणारी कडाक्याची थंडी जाणवत नसली तरी हवेतील गारव्याने थंडीची चाहूल मात्र जाणवू लागली आहे. त्यामुळे स्वेटर विक्रेते शहरात दाखल झाले आहेत.

दिवाळीत थंडी फारशी जाणवलीच नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी ही हुडहुडी भरवणाऱ्या थंडीशिवाय झाली. त्यात हवामानात सतत बदल होत असल्याने यंदा थंडी पडणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, आठवड्याभरापासून थंडीची चाहूल मात्र लागली आहे. शहरात सध्या दिवसभर हवेत गारवा जाणवत असल्याने रस्त्यांवर लोकरीचे कपडे विकणारे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्तरप्रदेश, गोंडा, बस्ती येथील स्वेटर विक्रते दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे लोकरीच्या स्वेटरबरोबर पुलओव्हर, जर्किन, जॅकेट त्याचबरोबर बटन्सच्या स्वेटरलाही विशेष मागणी आहे. तसेच जर्किन, जॅकेट आणि मिंकचे फ्रंट ओपन कोट खरेदीसाठी गर्दी होत आहे.

स्वस्त आणि मस्त पर्याय
लहान मुलांचे स्वेटर 150 ते 700 रुपये, पुरुषांचे साधे स्वेटर 250 ते 850 रुपये, फॅशनेबल स्वेटर 300 ते 900 रुपये, जॅकेट 400 ते 1200 रुपये, महिलांचे साधे स्वेटर 300 ते 700 रुपये, फॅशनेबल स्वेटर 300 ते 1500 रुपये, गोनम कोरियन 250 ते 550 रुपये, कानटोप्या 50 ते 150 रुपये, हातमोजे 100 ते 400 रुपये, कानपट्टी 50 ते 100 रुपये, मफलर 50 ते 300 रुपयांना उपलब्ध आहे.
Exit mobile version