‘ताराराणी’कडून आदिवासींची होळी गोड

250 आदिवासी बांधवाना पुरण पोळीचे जेवण

| मुरूड जंजिर | वार्ताहर |

सामाजिक दायित्व जपणार्‍या मुरूड येथील स्वराज्य सौदामिनी ताराराणी ढोल-ताशा पथकाने केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता होळी सणात आदिवासी बांधवांना सामील करून उदात्त कार्य आदिवासी वाड्यांवर जाऊन केले असून, त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

संपूर्ण महिला सदस्य असणार्‍या मुरूड स्वराज्य सौदामिनी ताराराणी ढोल ताशा पथकाची स्थापना एक वर्षापूर्वी झाली. केवळ व्यवसाय हा दृष्टिकोन न ठेवता पथकाने ढोलवादन, करमणुकीबरोबरच विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प सर्वानी सोडला आहे. त्याप्रमाणे पहिल्या वर्धापन दिनी पथकातील सर्व वादकांनी एकत्र येऊन मुरूड तालुक्यातील शिघ्रे नविवाडी, आगरदांडा आदिवासी वाडी, तिसले आदिवासी वाडी येथे प्रत्यक्ष जाऊन सुमारे 250 बांधवांना भात, वरण, भाजी, पुरण पोळीचे जेवण खाऊ घातले आणि आदिवासी बांधवांना होलिकोसत्वातील आनंदात सहभागी करून घेतले. ताराराणी पथकात सुमारे 30 महिला सदस्य आहेत.

याप्रसंगी पथकातील मृणाल खोत-गुरव, इशिक ठाकूर, समिधा उपाध्ये, राजश्री गोंजी, स्नेहा पटेल, स्पृहा लखमदे, निलांबरी हणमंते, ईशा चांदोरकर, अर्चना कोळवनकर, श्रद्धा उमरोटकर, वैशाली भावसार आदींनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांचे तोंड गोड करून सामाजिक समरसता आणि एकात्मतेचे दर्शनदेखील घडविले आहे.

Exit mobile version