साखरेसह गॅस, दुधाच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गॅस, दुधासह साखरेच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. या वाढत्या दराचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्यांना बसणार आहे. आता चहा पिण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. याचा आर्थिक भार मिठाई विक्रेत्यांनाही सोसावा लागणार आहे. त्यामुळे सणासुदीमध्ये मिठाईच्या दरामध्ये साधारणतः दहा ते वीस टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यामध्ये चहा बनविण्यापासून मिठाई व इतर पदार्थ तयार करण्यासाठी गॅसची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मिठाई, चहा व इतर खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी गॅसची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागते. पूर्वी गॅस सिलेंडरची अठरा किलोचा बाटला बाराशे ते दीड हजार रुपयांना मिळत होता. आता त्यामध्ये दुपट्टीने वाढ झाली आहे. तीन हजार रुपयांमध्ये हा बाटला मिळत अल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. आता या बाटल्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे.
गॅस सिलिंडरच्या दरानंतर दुधाच्या दरामध्येही भरमसाठ वाढ केली आहे. म्हशीचे दूध पूर्वी 80 रुपये लीटरने मिळत होते. ते आता 85 रुपये लीटरने बाजारात विकले जात आहे. म्हशीचे दूध पूर्वी 60 रुपये लीटर होते. आता त्यामध्ये पाच रुपयांनी वाढ करून 65 रुपये करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
साखर हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. लहान मुलांना साखर खायाला भरपूर आवडते. चहा बनविण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. तसेच वेगवेगळ्या दुकानांमध्ये मिठाई बनविण्यासाठी दुधासह साखरेचीही मागणी अधिक असते. मात्र, साखरेच्या दरात दुपटीने वाढ केल्याने सर्वसामान्यांसह चहा विक्रेते आणि मिठाई विक्रेत्यांचा आर्थिक ताळमेळ बिघडण्याचे संकट निर्माण झाले आहे.
44 ते 48 रुपये किलोने मिळणाऱ्या साखरेसाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागणार आहे. साखरेच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. चहाच्या दरात यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. दहा रुपयाला मिळणारा चहा आता 12 ते पंधरा रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. वीस रुपयांना मिळणारा चहा 25 रुपयांना मिळणार आहे. तसेच पेढे, बर्फी, लाडू, मलाई बर्फी आदी मिठाईच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सावसह दिवाळी, नवरात्र उत्सवात मिठाई खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
कमी उत्पादन आणि मर्यादित साठ्याच्या नियमांमुळे तसेच ऐन सणासुदीत साखरेला मागणी वाढल्याने दर झपाट्याने वाढले आहेत. तसेच हवामान बदलामुळे ऊस पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाल्याने साखरेचे दर वाढविल्याचे व्यावसायिकांकडून बोलले जात आहे.
गॅससह दूध तसेच साखरेच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. चहाबरोबरच मिठाईच्या दरातही प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. दहा ते वीस टक्क्यांनी मिठाईच्या दरात वाढ होऊ शकते. या महागाईचा परिणाम व्यवसायावरही होण्याची भीती आहे. खरेदी कमी होण्याची शक्यता आहे.
– हरिपाल कुशवाह, राधिका स्वीट मार्ट, वावे
