। बीड । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते, मराठवाडा अल्पसंख्यांक सेलचे प्रमुख भाई सय्यद गफार यांचे शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता निधन झाले. निधनसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. सय्यद गफार याचा जन्म बीडमधील स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात झाला होता. त्यांचे आईवडील स्वातंत्र्यसैनिक होते. या दोघांचा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या चळवळीदेखील सहभाग होता. मराठवाड्यात शेतकरी कामगार पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.
शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख, उद्धवराव पाटील, अॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दि.बा. पाटील, शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्याबरोबर अनेक लढ्यांत त्यांचा सक्रीय सहभाग होता. अॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दि.बा. पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले होते. अन्य अनेक राजकीय पक्षात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यामुळे अनेकादा अन्य पक्षातून त्यांना पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या जायच्या; परंतु त्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला होता. शेवटपर्यंत लाल बावट्यासाठी काम करेन, असा निर्धार त्यांनी केला होता. आणि, त्याप्रमाणेच ते शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्षातील नेतेमंडळींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.