पहिल्याच सामन्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयसीसीने यावर्षी होणार्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनामुळे भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. टी-20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जेतेपदाचा सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत 24 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होईल.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे गट आधीच जाहीर झाले आहेत. पहिल्या फेरीत 8 संघ सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसर्या फेरीत प्रवेश करतील. ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर 12 फेरी गाठतील. 2016 नंतरचा हा पहिला टी-20 वर्ल्डकप असेल. सुपर 12 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुबईमध्ये 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दुसरा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात त्याच दिवशी खेळला जाईल. तर सुपर 12 मध्ये, गट 2 मधील पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईच्या मैदानावर खेळला जाईल. या दिवशी फक्त एक सामना खेळला जाईल.
सुपर 12 च्या गट 1 मध्ये वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्या व्यतिरिक्त गट अ चा विजेता आणि गट ब चा उपविजेता संघ पहिल्या फेरीत असेल. दुसरीकडे, गट 2 मध्ये, भारत आणि पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसोबत पहिल्या फेरीच्या गट ब चा विजेता संघ आणि गट अ चा उपविजेता संघ असेल.