दसरा मेळाव्याबाबत सर्वसमावेशक भूमिका घ्या – शरद पवार

। मुंबई । प्रतिनिधी ।

शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार, यावरुन वाद सुरू असताना त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दसरा मेळावा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

सध्या शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यावर वाद न घालता समोपचारानं गोष्टी पार पडतील, याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पालिकेकडून निर्णय होल्डवर
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिकेकडून होल्डवर ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सव आटोपल्यानंतरच निर्णय घेऊ, असं स्पष्टीकरण महापालिका सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी दिलं आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कवरील परवानगीकरता जी नॉर्थ विभागाला दोन वेळा पत्र देऊनही महापालिकेने अर्ज अनिर्णीत ठेवला आहे. सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पवार घेणार नितीश कुमारांची भेट
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे 8 सप्टेंबर रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत. बिहारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर नितीश कुमार व पवार यांची पहिल्यांदाच दिल्लीत भेट होणार आहे.

Exit mobile version