उरणकरांचा संताप उसळला
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरात वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असली, तरी ही उपाययोजना केवळ दिखाऊ ठरत असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून होत आहे. ‘रस्ते मोकळे नसताना पार्किंग नियम लावून काय उपयोग?’ असा जळजळीत सवाल उरणकर उपस्थित करत आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाड्यांचा बेकायदेशीर ताबा, गॅरेजवाल्यांनी रस्त्यावरच उभारलेले अड्डे आणि वैष्णवी हॉटेल परिसरातील धोकादायक उंचवटा हे सर्व मिळून वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडवत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्यामुळे वाहनांना मार्गच उरत नाही, परिणामी दररोज नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या अडथळ्यांकडे पोलीस आणि नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ‘हातगाड्या, गॅरेज आणि अनधिकृत उंचवटे हटवले तर अर्धा प्रश्न आपोआप सुटेल; पण कारवाईचा बडगा उगारण्याची हिंमत प्रशासन दाखवणार का?” असा थेट सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
वाहतूक शाखा सम-विषम पार्किंगचे नियम लावून कारवाई करत असताना, रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ”नियम फक्त सर्वसामान्यांसाठी आणि मोकळीक अतिक्रमणधारकांसाठी?” अशी टीका जोर धरत आहे.
उरणकरांचा स्पष्ट इशारा आहे की, वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा हवा असेल तर केवळ पार्किंग नियम नव्हे, तर रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून कठोर कारवाई करावी. अन्यथा ''सम-विषम'' हा फक्त कागदोपत्री दिखावा ठरेल आणि नागरिकांचा संताप अधिकच भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
