| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात व शहर परिसरात सध्या उन्हाळा आणि पावसाचा लपंडाव सुरू आहे. या हवामानामुळे तालुक्यातील व शहरातील रस्त्यांवर उन्हाळ्यात धुळीचे आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरत आहे. त्याचा त्रास वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील मुख्य मार्गांवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. अनेक वाहने ओव्हरलोड सामान घेऊन प्रवास करत असल्याने रस्त्यांवर पडणाऱ्या माती, वाळू आणि धुळीचे ढिगारे संपूर्ण वातावरण धूसर करतात. उन पडताच ही धूळ हवेत उडते, तर पाऊस आला की हेच रस्ते चिखलाने भरून दलदलीसारखे होतात. या परिस्थितीत मोटारसायकलस्वार आणि वाहन चालकांचा तोल सुटून अपघातांच्या घटना वाढत आहेत. रस्त्यांवरील खोल खड्ड्यांमुळेही अनेकांना जीवघेणा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, या गंभीर परिस्थितीकडे शासकीय यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. ना रस्त्यांची नियमित देखभाल केली जाते, ना धुळ नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे व धुळ नियंत्रणाचे उपाय करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





