मा. नगरसेवक समीर म्हात्रेंची मागणी
| पेण | प्रतिनिधी |
पेणमधील अनधिकृत दुकाने व टपर्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पेण नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी पेण नगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
समीर म्हात्रे यांनी याबाबत नगरपालिकेला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, पेण येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या रिंग रोडवर शांतीनिकेतन सोसायटीसमोर परिहार स्विटमार्ट कॉर्नर हे दुकान कोणत्याही प्रकारची बिनशेती परवानगी व बांधकाम परवानगी न घेता चालू करण्यात आलेले आहे. याशिवाय या दुकानाच्या बाहेर वडापाव, पाणीपुरी इत्यादी प्रकारच्या अनधिकृत टपर्या चालू करण्यात आलेल्या आहेत. तसेच गोंदकर यांच्या घराशेजारीच अनधिकृतरित्या पक्के गाळे चालू ठेवलेले आहेत. त्याबाबत आपण त्यांना नोटीसही दिलेली होत्या. परंतु, सदर नोटीशींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही.
तसेच नगरपालिकेमध्ये कमर्शिअल आरक्षण असलेल्या आर.सी. इलेक्ट्रॉनिकच्या समोरील जागेतदेखील अनेक अनधिकृत गाळे दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. शिवाय, या टपर्यांजवळ सकाळ, संध्याकाळ होणार्या नागरिकांच्या गर्दीमुळे जाणे-येण्याचा रस्तादेखील बंद झालेला आहे. सकाळच्या प्रहारी लहान मुले शाळेमध्ये याच रस्त्यावरून जात असतात; परंतु त्या अनधिकृत टपर्यांमुळे समोरून येणारी गाडी त्यांना दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. या प्रकरणाची वारंवार तोंडी तक्रार केली असतानादेखील त्यावर कारवाई करण्यात आलेली दिसत नाही.
समीर म्हात्रे म्हणाले की, टपर्यांचा अनागोंदी कारभार त्वरित बंद करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून नगरपालिकेविरुद्ध निदर्शने केली जातील.
टपर्यांचे पेव
पेण शहरामध्ये 270 ते 280 अनधिकृत टपर्या व हातगाड्या आहेत. या टपर्याधारकांना लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचा छुपा पाठिंबा असल्याने आज अनधिकृत टपर्यांचे पीकच जणू काही पेण शहरामध्ये आलेले आहे. पेणच्या नाक्या-नाक्यावर कुजबूज आहे की, एका टपरीमागे महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे भाडे अधिकारी आकारत आहेत. यातील काही हिस्सा लोकप्रतिनिधींनादेखील दिला जात आहे. महिन्याला यातून सुमारे पाच लाख रुपये जमा होत असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे अनधिकृत टपरी मालकदेखील उजळ माथ्याने तक्रार करणार्यांच्या विरुद्ध आमचे तुम्ही काही वाकडे करू शकत नाहीत, अशा वल्गना करतात.