। म्हसळा । प्रतिनिधी ।
तालुक्यातील घूम येथील 14 वर्षीय शाळकरी विध्यार्थी गौरांग दिनेश गायकर याला ताप आल्याने त्याच्यावर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. येथे योग्य उपचार होत नव्हते म्हणून म्हसळा येथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविले होते. परंतु, तेथील कर्तव्यास असलेल्या संबंधित डॉक्टरांनी गौरांगला दवाखान्यात दाखल करून न घेता भर रात्री माघारी पाठवले होते. उपचार करण्यास केलेल्या हलगर्जीपणामुळे गौरांगचा दि. 6 एप्रिल रोजी रामनवमीचे दिवशी सकाळी मृत्यू झाला होता. या गंभीर प्रकरणाची गृहविभागाने दखल घेऊन संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
गौरांगचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याची तक्रार म्हसळा तालुका जय श्री कृष्ण गवळी समाज उन्नती संस्था अध्यक्ष रवींद्र लाड यांनी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली होती. तक्रार अर्जाची शासनाने दखल घेऊन जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांची योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र शासन विशेष कार्य अधिकारी राज्यमंत्री गृह आणि ग्रामीण विभाग हेमंतकुमार मोहन यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. तशा आशयाचे पत्र रवींद्र लाड यांना गृह विभागाकडून प्राप्त झाले आहे. गौरांग मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी केलेली मागणी आणि त्यावर गृह विभागाने दखल घेऊन कारवाईचे दिलेले निर्देश हे जय श्री कृष्ण गवळी समाज उन्नती संस्था म्हसळा यांच्या एकजुटीचे यश म्हणावे लागेल. कै. गौरांगला न्याय मिळेपर्यत हा लढा सुरु राहील, असे रवींद्र लाड यांनी सांगितले.