सावधान! मुलांना सांभाळा बाबांनो…ग्रामपंचायतीचे आवाहन

। चिरनेर । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात लहान मुलांना पळवून नेण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पालकांनी व मुलांनी सतर्क राहण्याचे आवाहन चिरनेर ग्रामपंचायत प्रशासना मार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी चिरनेर ग्रामपंचायतीने गावातील नाक्या नाक्यावर सावधान रहा, मुलांना पळवून नेणारी टोळी सर्वत्र फिरत आहे, अशा प्रकारचे पोस्टर लावून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे .
दररोज इंटरनेटवर मुले पळवून नेणारी टोळी फिरत असल्याच्या सूचना मिळत असल्यामुळे मुले व पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सूचनांच्या अनुषंगाने चिरनेर ग्रामपंचायतीने परिसरातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देऊन, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, सावधगिरी पाळण्यासाठी गावात फिरणारे फेरीवाले, भंगारवाले, ढोंगी बाबा, संशयित, अनोळखी व्यक्ती या सर्वांना गावात फिरण्यास सक्त मनाई केली आहे. अशा व्यक्ती गावात आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. तर बाहेर गावावरून चिरनेर गावात राहायला आलेल्या, भाडेकरूंना रात्री नऊनंतर गावात फिरण्यास बंदी घातली आहे. तसेच ज्या ग्रामस्थांनी मालकीच्या रूम भाडेकरूंना भाड्याने दिल्या असतील, अशा भाडेकरूंची सर्व महत्त्वाची कागदपत्रे उरण तालुका पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी पाठवून, त्यांची योग्य ती पडताळणी करून घ्यावी व त्यानंतर ती पडताळणी केलेली कागदपत्रे चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतीने दिल्या आहेत.

एकंदरीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे.सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला आळा बसतो. त्याचबरोबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत होते. त्यामुळे प्रत्येक गावाच्या परिसरात जास्तीत जास्त ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, जेणेकरून परिसरातील नागरिक सुरक्षित राहतील, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

Exit mobile version