सरपंच ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करा

निलेश जाधव यांची मागणी

| पेण | प्रतिनिधी |
शेडाशी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच प्रकाश कदम व ग्रामसेवक विशाल पाटील यांनी संगनमताने अनुसूचित जातीच्या वस्तीतील हक्काची व्यायामशाळा दुसरीकडे हलवून समाज बांधवांवर अन्याय केला असून, शासनाचीदेखील फसवणूक केली आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड अलिबाग सुनील जाधव यांनी 8 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, 4 फेब्रुवारीपासून साधारणताः दीड महिना उलटून गेला तरीदेखील सरपंच प्रकाश कदम व ग्रामसेवक विशाल पाटील यांच्याविरुद्ध कारवाई झाली नाही. त्यामुळे निलेश जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी सरपंच व ग्रामसेवकाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी ग्रामसेवक व सरपंच दोषी असल्याचा अहवाल देऊनदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हे सरपंच प्रकाश कदम व तत्कालीन ग्रामसेवक विशाल पाटील यांच्यावर मेहेरनजर का करत आहेत, हे समजत नाही. अथवा विशाल पाटील हा जिल्हा परिषदेचा कर्मचारी असल्याने डॉ. किरण पाटील हे त्याला वाचविण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना? आजच्या घडीला मालदेव-बौध्दवाडी येथील खुल्या व्यायामशाळेचे साहित्य मालदेव येथे न बसवून अनुसूचित जातीच्या बांधवांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असून, जातीय तेड निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी सरपंच आणि ग्रामसेवकावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.

निलेश जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेला आहे. या आठ दिवसांच्या आत त्यांनी समाजात तेड निर्माण होऊ नये म्हणून या दोषींवर कारवाई करावी, असे आवाहन केले आहे.

दिनांक 24 मार्चच्या पान नंबर 3 वरील ‘व्यायामशाळा वादाच्या भोवर्‍यात’ या बातमीमध्ये ग्रामसेवक एकनाथ दाताळी यांचे नाव सहाय्यक आयुक्तांच्या नोटीशीनुसार टाकण्यात आले होते. परंतु, व्यायामशाळेच्या जागेत बदल झाले, त्यावेळी ग्रामसेवक विशाल पाटील हे कार्यरत होते. त्यामुळे या प्रकरणाशी एकनाथ दाताळी यांचा संबंध नाही.

Exit mobile version