अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा

पाली तहसीलदारांना निवेदन सादर
| पाली/बेणसे | वार्ताहर |

पाली-वाकण-खोपोली मार्गावरील वाढत्या अपघाताची मालिका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुधागडातील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत मंगेश वाघमारे यांचे अपघाती निधन याच मार्गावर झाले असून, अगदी काल-परवा तिवरे येथेदेखील एका तरुणाचा मोटार सायकलवरून मोठा अपघात होऊन त्याचे जागीच निधन झाले. त्यामुळे हे वाढते अपघात रोखण्यासंदर्भातील निवेदन समन्वय व पुनर्विलोकन समितीचे सदस्य तथा वाघोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक पवार यांनी सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना देण्यात आले आहे.

खोपोली-पाली-वाकण मार्गावरील असे अनेक अपघात रोखण्याकरिता या मार्गावर स्पीड ब्रेकर स्ट्रीप आणि सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित बसून मिळावेत जेणेकरून लोकांच्या जीवाची काळजी घेता येईल. तसेच या मार्गावर अनेक शाळकरी मुले, नोकरदार वर्ग, व्यावसायिक ये-जा करीत असताना जीव मुठीत धरून प्रवास करतात. या मार्गावर होत असलेल्या अपघाती मालिकांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषयाचे गांभीर्य आणि दक्षता घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आम्हास वरील सुविधा उपलब्ध न झाल्यास खुरावले येथे अनेक ग्रामस्थांसह खोपोली-पाली-वाकण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करावा लागेल, असा इशारा दीपक पवार यांनी दिला आहे.

Exit mobile version