सावित्रीरत्न महिलांकडून प्रेरणा घ्या- पंडीत पाटील

शेकापच्यावतीने महिलांना सावित्रीरत्न पुरस्कार देऊन गौरव

। अलिबाग । प्रतिनिधी ।

विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून आकाशाला गवसणी घालतानाच जमिनीवर घट्ट पाय रोवून वास्तवाचे भान जपणार्‍या प्रत्येक पुरस्कार विजेती महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन माजी आ. पंडीत पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुका महिला आघाडीतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सावित्रीच्या लेकींचा बुधवारी (दि.8) सकाळी 10 वाजता सावित्रीरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलत होते.


यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी जि.प.सदस्या भावना पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा पाटील, माजी जि.प.सदस्या चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, शेकापचे नेते संदीप घरत, कुंदा गावंड, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका, ग्रामपंचायत सदस्या आदी मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.


यापुढे मार्गदर्शन करताना पंडीत पाटील म्हणाले की, चित्रलेखा पाटील यांच्यामुळे समाजातील विविध घटकांमधील महिलांशी ओळख झाली. विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना या तालुक्याच्या व्यासपीठावर आणण्याचं काम चित्रलेखा पाटील यांच्या महिला आघाडीने केल्याबद्द्ल त्यांचे विशेष आभार. तसेच यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांचा विशेष उल्लेख केला. कारण महिलांना 33 टक्के आरक्षण हे त्यांच्या कार्यकाळात मिळालं. त्यामुळे सुप्रिया पाटील या अध्यक्षा होऊ शकल्या. त्यानंतरही भरपूर महिलांना अध्यक्ष होता आलं असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी शिक्षण हे शहरापुरतीच मर्यादित होते. मात्र ग्रामीण भागात शिक्षण पोहोचविण्याचे खास करून महिलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम अ‍ॅड. दत्ता पाटील, स्व. प्रभाकर पाटील आणि जयंत पाटील या तीन व्यक्तींनी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.



शेकाप बोलत नाही तर करुन दाखवितो- चित्रलेखा पाटील
सावित्रीरत्न पुरस्कार हा शेकाप तर्फे महिलांच्या कार्याला देण्यात येणारा लाल सलाम आहे. प्रत्येक जण एका वेगळ्या संघर्षातून, एका वेगळ्या परिस्थितीतून स्वतःचा एक कुठेतरी मार्ग बनवत आहे. शेकापने कायमच महिलांना प्रोत्साहन दिले आहे. स्थापनेपासूनचे ठराव वाचले तर त्यात एक गोष्ट कायम दिसेल, ती म्हणजे महिलांना प्रोत्साहन देणे, महिलांचे प्रश्‍न मांडणे, महिलांना बरोबरीचा दर्जा देणे. हे शेकाप फक्त कागदात बोलत नाही तर कृतीत पण करुन दाखवितो. आज या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक महिलेची स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. शेकापने मीनाक्षी पाटील यांच्यासारख्या रणरागिणी घडविल्या. शाळेत जाताना सावित्रीबाईंनाही खूप त्रास सहन करावा लागला होता. आज ती परिस्थिती नाही. पण अजूनही टप्प्याटप्प्यावर महिलांमध्ये कुठेतरी भेदभाव होत आहे. कोणतं क्षेत्र पुरुषांसाठी आणि कोणतं क्षेत्र महिलांसाठी आहे, असा भेदभाव केला जात आहे. त्याच्यावर अजून काम करण्याची गरज आहे. मागील दोन ते तीन वर्षात शेकापने सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे उपक्रमाअंतर्गत 40 हजार मुलींना सायकल वाटप केल्या आहेत. काही मुलींची आर्थिक स्थिती खूप बिकट असते. शाळेपर्यंत जाण्यासाठी लागणारे प्रवास भाडे मिळेल तेव्हाच शाळेत जाता येते. सायकलींच्या माध्यमातून त्यांना नियमित शाळेत जायला भेटणार, हा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येतो. अशा परिस्थितीत जेव्हा पक्ष कार्य करतो तेव्हा पक्षाला एकप्रकारे प्रोत्साहन मिळते. महापुरुषांना केवळ हार घालून चालणार नाही तर, त्यांचे विचार तुम्ही कसे पुढे घेऊन जाणार, याचाही विचार करणे गरजेचे आहे. यापुढे त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे विशेष कौतुक करीत शाबासकी दिली.

आज जागतिक दिनाच्या निमित्ताने तुमच्या ज्या काही मनामध्ये इच्छा असतील, जे काही व्हिजन असेल, जी काही स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची असतील, काही स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल त्या अस्तित्वानिशी तुमचं चित्र डोळ्यांमध्ये जर साठवत असाल तर ती संपूर्ण स्वप्न पूर्णत्वास येऊ दे, अशी मनापासूनची देवाचरणी प्रार्थना करेन. केवळ एक दिवस नाही तर, 365 दिवस हे महिलांचे असतात. कारण वर्षभर महिला काही ना काही भूमिका जगत असतात.

चित्रा पाटील, माजी जि.प. सदस्या

शेकापने कायम महिलांचा सन्मान केला. मात्र सध्याची पारिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आज एकही महिलेचा समावेश नाही याचा खेद वाटतो. पण तुमच्यासारख्या रणरागिणी पुढे आल्या तर एक दिवस या विधीमंडळात महिला आमदारांचा व महिला मंत्र्यांचा आवाज महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल, हे निश्‍चित.

अ‍ॅड. मानसी म्हात्रे, माजी उपनगराध्यक्षा, अलिबाग


या महिलांचा गौरव
यामध्ये क्रीडा क्षेत्राकरिता शर्विका म्हात्रे, रचना म्हात्रे, काळभैरवनाथ क्रीडा मंडळ मोरोंडे, शैक्षणिक क्षेत्राकरिता सिया अग्रवाल, अंगणवाडी सेविका श्रीमती निता गोंधळी, सीआरपी (बचत गट) क्षेत्राकरिता मेघना पाटील, योगा फिटनेस करिता सायली वैद्य, विद्या मोहिते, कला क्षेत्रात ज्योती राऊळ, पायलट क्षेत्राकरिता कॅप्टन कृतज्ञा हाले, शितल ससाणे, वैद्यकीय क्षेत्राकरिता प्रसन्ना नाखवा, वकीली क्षेत्राकरिता निहा राऊत, पत्रकारिता क्षेत्राकरिता माधवी सावंत, फॅशन क्षेत्राकरिता प्रिती झुंझारराव, युथ आयकॉन महिला अंकिता राऊत, बँकिंग क्षेत्राकरिता शिल्पा पाटील, आदिवासी कर्तुत्ववान महिला प्रेमा दरोडा, पार्वती मेंगाळ, शिक्षण क्षेत्राकरिता पूनम मढवी, रसिका म्हात्रे, खाद्य क्षेत्राकरिता दीप्ती राऊळ, विनया पाटील, कोळी व्यावसायिका अनुजा कुलपे, सरपंच रोहिणी पाटील, कंडक्टर क्षेत्राकरिता संगीता म्हात्रे, उद्योजिका या क्षेत्राकरिता रत्नप्रभा बेल्हेकर, श्रावणी लाल, आशा वर्कर क्षेत्राकरिता रेश्मा पाटील, विधवा कर्तृत्ववान महिला अनिता शेंडे, हर्षला ठाकूर, स्नेहल कंदु, सामाजिक कार्याकरिता तपस्वी गोंधळी आदीं महिलांना सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version