श्रेय घ्या, पण तालुक्याचे प्रश्‍नही मार्गी लावा

मंत्री अदिती तटकरेंना विकास आघाडीचे खडेबोल

| तळा | वार्ताहर |

आपल्याच पाठपुराव्यामुळे तळा ग्रामीण रुग्णालय सुरु झाल्याचा दावा मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयाच्या पाहाणी दौर्‍यादरम्यान केला होता. हे रुग्णालय सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार्‍या विकास आघाडीच्या विराज टिळक आणि रामदास तळकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. रुग्णालय सुरू झाल्याचे श्रेय त्यांनी घ्यावे, पण त्याचबरोबर तालुक्यातील इतर प्रश्‍नदेखील त्यांनी मार्गी लावावेत, असे खडेबोल सुनावले आहेत.

तळा येथील ग्रामीण रुग्णालय अडीच वर्षांपासून बंद होते. हे ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, अन्यथा रुग्णालयाचे श्राद्ध घालण्याचा इशारा देणारे पत्र तळा विकास आघाडीकडून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांना देण्यात आले होते. त्या पत्राची दखल घेत आठ दिवसांत हे रुग्णालय सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन डॉ. देवमाने यांनी विकास आघाडीला दिले होते. त्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करून हे रुग्णालय सुरूदेखील करण्यात आले. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रालयात एक बैठक घेऊन या रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी या रुग्णालयाची पाहणी केली आणि आपल्याच पाठपुराव्यामुळे हे रुग्णालय सुरु झाल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याला प्रत्युत्तर देताना, श्रेय जरूर घ्या, पण रुग्णालय सुरु करण्यासाठी अडीच वर्षे का लागली याचेही उत्तर ना. तटकरे यांनी द्यावे, असे आव्हान विराज टिळक आणि रामदास तळकर यांनी दिले आहे. विकास आघाडीला कोणत्याही निवडणुका लढवायच्या नाहीत. त्यामुळे आम्हाला श्रेय घ्यायचेच नाही. जनतेला सुविधा मिळवून द्यायचा आहेत, असे टिळक आणि तळकर म्हणाले.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असताना, शासन यंत्रणा बरोबर असताना जनतेला वेठीस धरून त्यांनी तळा तालुक्याला वार्‍यावर का सोडले, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे. जनतेच्या प्रश्‍नांवर तळा तालुका विकास आघाडी यापुढेही लोकशाही मार्गाने आंदोलने करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version