योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या; जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांचे आवाहन

। अलिबाग । वार्ताहर ।
गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा हेतू स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्‍या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविणे हा आहे. अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके विकत घेण्यास अडचणी येतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. तुम्ही वेळ वाया घालवू नका, कोणत्या वेळेत काय करायचे आहे, हे ठरवा, योग्य नियोजन करून गरुड झेप घ्या, भरारी घ्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच पेण येथे केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्‍या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथील या मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटन समारंभानंतर तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी यू.पी.एस.सी/एम.पी.एस.सी तयारीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत केवळ दोनच दिवसात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणार्‍या रायगड जिल्ह्यातील 345 मुले आणि 494 मुली असे एकूण 839 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व दूरदृष्यप्रणालीद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. याशिवाय या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्ह्यातून अधिक प्रतिसाद मिळाल्यास जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्येदेखील अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असा मानस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, तहसिलदार अक्षय ढाकणे, पेण मुख्याधिकारी जीवन पाटील, भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे संस्थापक मंगेश नेने, महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद धारप, शिवचरित्रकार प्रशांत देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version