तळा कृषी विभागाकडून शेती शाळेचे आयोजन
| तळा | वार्ताहर |
रोवळा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण तृणधान्य उप अभियान अंतर्गत भात पीक शेती शाळेच्या तिसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतीशाळेतील शेतकऱ्यांना भात लागवडीच्या विविध लागवड पद्धती विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमानंतर शेतीशाळा प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये चार सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. यामध्ये शेतीशाळेतील शेतकऱ्यांनी सुद्धा प्रत्यक्ष सहभागी होत चारसूत्री भात लागवडी पद्धतीने लागवड केली व लागवडीविषयी माहिती घेतली.
चारसूत्री पद्धतीमध्ये भाताचा पेढा गिरिपुष्पाचा पाला हे सर्व टाकून प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात आला होता. पारंपारिक भात लावणीपेक्षा शेतकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीचे फायदे होत आहेत. या पद्धतीत कमी रोप लागतात, शिवाय खर्चही कमी येतो. मजूरवर्ग कमी लागतो आणि उत्पादन अधिक मिळते. त्यामुळे कृषी विभागाने तालुक्यामध्ये सुधारित भात लागवड तंत्रज्ञाना विषयी मोठ्याप्रमाणात जनजागृती केली आहे. सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने या पद्धतीने लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे. या लागवडीतून मजुरीच्या खर्चाची बचत होण्याबरोबर वेळही वाचतो व उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही पद्धत चांगली आहे. या पद्धतीचे मार्गदर्शन उप कृषी अधिकारी कुलकर्णी व सहाय्यक कृषी अधिकारी गोविंद पाशीमे यांनी केले.
शेती शाळेच्या माध्यमातून आम्हाला चारसूत्री भात लागवडीचे मार्गदर्शन करण्यात आले. ही सुधारित पद्धत सोपी असून कमी खर्चिक आहे. या पद्धतीमुळे जास्त उत्पादन घेणे शक्य होणार आहे.
– ज्ञानेश्वर तांदळेकर, शेतीशाळा प्रशिक्षणार्थी







