गावठी हातभट्टीबाबत तळा पोलीस अनभिज्ञ?

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| तळा | प्रतिनिधी |

तळा पोलिसांकडून शहरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर रविवारी (दि.29) धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, भर वस्तीत व पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या परीट आळीत सुरू असलेल्या गावठी हातभट्टीबाबत तळा पोलीस अनभिज्ञ होते का, असा सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बऱ्याच काळापासून परीट आळीत सुरू असलेल्या या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्याबाबत तळा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पदभार स्वीकारतानाच जिल्ह्यातील सर्व अवैद्य धंदे बंद करून टाकणार असल्याचे म्हटले होते. त्याच दृष्टीने त्यांच्याकडून कार्यवाही देखील सुरू करण्यात आली होती. त्यामुळेच तळा पोलिसांना ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेला हातभट्टी दारू अड्डा निदर्शनास आला असावा, अशी चर्चा शहरातील नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे उशिरा का होईना, तळा पोलिसांना जाग येऊन त्यांनी या ठिकाणी धाड टाकून 1 हजार 700 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. तसेच, आरोपी चंद्रकांत भिकू तळकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, काही दिवसांनी पुन्हा गावठी हातभट्टीची दारू विक्री होणार नाही, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षाही शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version