महावितरणचा भोंगळ कारभार उघड
| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुका गेल्या तब्बल 48 तासांपासून अंधारात बुडाला असून, महावितरणच्या कथित निष्काळजी व भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला असून, शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. व्यापारी व लघुउद्योगांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासह सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवनही मोठ्या अडचणीत सापडले आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप होत आहे. नेमका बिघाड कोणता, तो कधी दुरुस्त होणार आणि वीजपुरवठा पूर्ववत कधी सुरू होणार, याबाबत अधिकृत माहिती दिली जात नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेली जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या गंभीर परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाकडे ठामपणे पाठपुरावा करण्याऐवजी त्यांनी मौन बाळगल्याची टीका होत आहे. निवडणुकीत विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा तालुकाभर सुरू आहे.
संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे की, उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांपुरतेच अनेक लोकप्रतिनिधी सक्रिय दिसतात. मात्र वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेताना ते दिसून येत नाहीत. “लाईट नाही, पाणी नाही, रस्ते धड नाहीत, चांगले रुग्णालय नाही, रोजगाराच्या संधी नाहीत आणि गटारांचीही योग्य व्यवस्था नाही. नाईलाज म्हणून येथे राहावे लागते,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, बिघाडाचे नेमके कारण जाहीर करावे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा नागरिकांचा वाढता रोष तीव्र आंदोलनाचे रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
