। तळा । वार्ताहर ।
तळा शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा केंद्रांच्या ठिकाणीही वीजपुरवठा विस्कळित झाला असल्याने प्रामुख्याने तळा शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. तळा बाजारपेठ आणि परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे तळा तालुका शेतकरी संघटनेची महावितरण पदाधिकारी यांच्या सोबत संवाद बैठक पार पडल्या नंतर विजेच्या लपंडावात भर पडली आहे. महावितरण उपअभियंता घावरे यांनी दिलेले आश्वासन फोल गेले आहे. तसेच, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने याचा परिणाम विजेवरील उपकरणांवरही होत असल्याच्या तक्रारीदेखील नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.
तळा शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा केंद्रातील वीजपुरवठा विस्कळित झाला असल्याने पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली आहे. गणेश उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी, गणेश भक्त गावाकडे आले आहेत. परंतु, विजेच्या लपंडावामुळे आणि पाणी नसल्याने हैराण झाले आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांमध्ये पावसामुळे भर पडली आहे. पावसामुळे फिडर आणि ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन तळा शहर आणि परिसर सतत अंधारात जात आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत होण्यासाठी विलंब लागत आहे. यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये अडथळे येत असल्याच्या तक्रारी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत. महावितरणकडे तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना महावितरण कार्यालयात जाऊन सतत तक्रारी नोंदविण्याची वेळ येत आहे.