माथेरानला पर्यायी मार्गाची गरज
। माथेरान । वार्ताहर ।
अतिदुर्गम भागात वसलेल्या माथेरानसारख्या टुमदार पर्यटनस्थळाला निसर्गाने भरभरून ओतप्रोत सुंदरता दिलेली असून नैसर्गिक वरदहस्त लाभलेला आहे. राज्यातील एकमेव प्रदूषणमुक्त स्थळ असल्यामुळेच इथे बाराही महिने पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीसुद्धा येण्या-जाण्यासाठी नेरळ मार्गे माथेरान हा एकमेव वाहतुकीसाठी आणि दळणवळण सुविधेकरिता मार्ग उपलब्ध असल्याने या पर्यटनस्थळाच्या विकासाची कवाडे अद्यापही बंद आहेत.
ब्रिटिश कालखंडात 1850 साली या ठिकाणाचा शोध लागला असून येथे येण्यासाठी पर्यायी मार्गाने व्यवस्था उपलब्ध असतानादेखील केवळ शासनाच्या दिरंगाईमुळे आणि राजकारणापायी आजमितीपर्यंत पर्यटन वाढीसाठी पर्यायी मार्ग बनविण्यात आलेला नाही. यामुळेच पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणार्या भूमिपुत्रांना नाईलाजाने नेरळ मार्गे माथेरान मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच, अत्यावश्यक सेवासुविधा याच मार्गी असून यामध्ये वीज यंत्रणा असो किंवा पाणी योजना असो, जीवनावश्यक साहित्याची आवकदेखील याच मार्गाने केली जात आहे. यामुळे वाढीव दराने वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत.
या एकमेव घाटरस्त्यात अनेकदा पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन जाते. याचे उदाहरण म्हणजे 2005 मध्ये अतिवृष्टीमुळे मिनीट्रेन सेवा तब्बल दोन वर्षे बंद करण्यात आली होती. तर, मोटार रस्ता सुध्दा काहीकाळ बंद करण्यात आला होता. याकाळात माथेरानचा बाहेरच्या शहरांशी संपूर्ण जनसंपर्क तुटल्याने स्थानिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. एखाद्याची अंतयात्रादेखील घाटरस्त्यात दोरीच्या सहाय्याने वर चढत केली जात होती. इतकी भयानक परिस्थिती त्यावेळी स्थानिकांनी अनुभवली आहे. अशीच परिस्थिती पुन्हा कधी निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणे काळाची गरज बनली आहे.
मागील काळात पनवेल-धोदाणी मार्गे सनसेट पॉईंटपर्यंत फिनिक्युलर रेल सेवेचा महत्वाकांक्षी प्रकल्प जवळजवळ मार्गी लागणार होता. परंतु, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी केवळ नेरळ भागातील मतांसाठी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. यामुळे आजपर्यंत याठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण केली जात नाही आणि भविष्यात सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे. यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी या स्थळाकडे लक्ष केंद्रित करून येथील पर्यटन कशाप्रकारे वाढू शकते. याकामी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन दिल्यास हा संपूर्ण दुर्गम भाग सुशोभित होऊन पर्यटन क्रांती घडू शकते. तसेच, शासनाने सद्यस्थितीत फिनिक्युलर अथवा रोपवे या पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणावर खर्चिक पर्यटक येऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होऊ शकतात.
पर्यायी मार्गाची दिशा
पनवेल (धोदाणी) येथून फिनिक्युलर रेल्वे सेवा तसेच आदिवासी वाडीतून थेट सनसेट पॉईंटपर्यंत मोटार रस्ता निर्माण होऊ शकतो. याच रस्त्याचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते चार दशकांपूर्वी करण्यात आले होते. तसेच, कर्जत-डीकसळ येथून गारबट पॉईंटमार्गे माधवजी पॉईंटपर्यंत प्रस्तावित असणारा रोपवे प्रकल्प सुरू होऊ शकतो. तर, चौक येथून रामबाग पॉईंटपर्यंत मोटार वाहन रस्ता केवळ चार किलोमीटर अंतराचा आहे. हा मार्गसुध्दा शासनाने ठरविल्यास उपलब्ध होऊ शकतो.
प्रवाशांचा हिरमोड
नेरळ-माथेरान घाटरस्त्यात प्रत्येक सुट्ट्यांमध्ये घाटात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. यामुळे पर्यटकांना आपल्या मुलाबाळांना सामानसुमान घेऊन स्वतःच्या गाड्या घाटात पार्क करून पायपीट करावी लागते. अपंग व्यक्तीला आणतानासुध्दा पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागत असून सुखकर प्रवास होत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.