वाघाच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू?

महाजने येथील दिवीवाडी परिसरात चर्चेला उधाण

| रायगड| जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडीमधील एका शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला केल्याची चर्चा जोरात आहे. मात्र, याच वाडीपासून काही अंतरावर असलेल्या गेल कंपनीच्या बाजूकडील जंगलभागात एका सुरक्षा रक्षकाला काही दिवसांपूर्वी वाघ दिसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनपाल नाझरकर यांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवीवाडी येथील एका शेतकऱ्याचा बैल घरापासून काही अंतरावर गोठ्यामध्ये बांधला होता. मात्र, सकाळी गोठ्यात गेल्यावर बैल मृतावस्थेत आढळून आला. या बैलावर वाघाने हल्ला केल्याची चर्चा जोर धरत आहे. मागील आठ दिवसांपूर्वी उसर येथील गेल कंपनीच्या बाजूला असलेल्या जंगल भागात एका सुरक्षा रक्षकाला रात्रीच्या वेळी एक वाघ दिसून आला. याबाबत अलिबागचे वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांच्याशी संपर्क साधला, मात्र होऊ शकला नाही. परंतु, वनपाल नाझरकर यांच्याशी साधल्यावर सुरक्षा रक्षकाला ज्या ठिकाणी वाघ दिसला, तो जंगल भाग येतो. पट्टेरी वाघ या भागात नाही. बिबट्याचा वावर असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी परिसरातील स्थानिकांसह पोलीस पाटील यांच्याशीदेखील संपर्क साधून नागरिकांना जंगल भागात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, दिवीवाडी हा भाग त्यांच्या हद्दीत येत नसल्याचे त्यांनी सांगितले. वनपाल भोईर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले, दिवीवाडीमधील एका व्यक्तीच्या बैलावर वाघाने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी जाऊन पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जंगल भागातून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version