ग्राम स्वच्छता अभियानात तलोशी गाव प्रथम

। महाड । प्रतिनिधी ।

महाड तालुक्यातील तलोशी गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच विविध सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे केलेल्या स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या उपक्रमांमुळे तलोशी गावाला हा मान मिळाला आहे.

गावात नियमित स्वच्छता मोहीम, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त गाव उपक्रम तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या सर्व बाबींची दखल घेत परीक्षक समितीने तलोशी गावाची प्रथम क्रमांकासाठी निवड केली. या यशामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या वेळेस उदयसिह साळूंखे गट विकास अधिकारी पंचायत समिती महाड, शुभांगी नाखले उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग, जयवंत गायकवाड जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रायगड जिल्हा परिषद अलिबाग, साक्षी सचिन पार्टे सरपंच तळोशी, गणपत पार्टे उपसरपंच, संदीप बागडे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते. गावाने मिळविलेल्या या यशामुळे महाड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यापुढेही गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांना कृतीत उतरवत तलोशी गावाने इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण केला असून या यशामुळे तालुक्यातील इतर गावांनाही स्वच्छता अभियानात अधिक जोमाने सहभागी होण्याची प्रेरणा मिळणार आहे.

Exit mobile version