| पनवेल | प्रतिनिधी ।
मद्यपी टँकर चालकाने कारला जोरदार धडक दिल्याची घटना कोन पोलीस चौकीसमोर पनवेल लेनवर घडली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, टँकर चालक अवधेश कुमार रामसंबंध मिश्रा याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडीवली येथील कृष्णा वाघे हे त्यांच्या कारने सामान खरेदीसाठी नवीन पनवेल येथील डी-मार्टकडे जात होते. दुपारी 2.00 वाजताच्या सुमारास कोन पोलीस चौकीसमोरील पनवेल लेनवर पोहोचले असता, मागून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या टँकरचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धडकेत कारच्या उजव्या बाजूचे मागील दार चेपले गेले. तसेच, मागील उजव्या बाजूचे टायर फुटले असून, मडगार्डचेही नुकसान झाले आहे.







