कशेडी घाटात टँकरची तीन म्हशींना धडक

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील सडवली फाट्याजवळ कशेडी घाट उताराच्या रस्त्यावर तीव्र वळणामुळे टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने तीन म्हशींना धडक दिली. या अपघातामध्ये एक म्हैस जागीच ठार झाली तर अन्य दोन म्हशी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली.

गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सडवली गावातील सचिन सदाशिव जाधव (वय 35) हा त्याच्या ताब्यातील टँकर क्रमांक एमएच24 एयु 1385 हा चोळई फाट्याजवळ असताना अंधारात अचानक चार-पाच म्हशी वाहनासमोर आल्या. त्याने तातडीने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने त्यापैकी तीन म्हशींना धडक लागली. या अपघातात एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन म्हशींची शिंगे तुटली असून त्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी चालक सचिन जाधव याने स्वत: पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये येऊन माहिती दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version