कर्जतमधील 123 नळपाणी योजना बंद

आमदारांकडून वनराई बंधारे बांधण्याचा सल्ला

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला नाही. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून पाऊस गायब झाल्याने येथील धरणं फुल्ल भरली नाहीत. त्यामुळे पाणीटंचाई आढावा बैठकीत कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी वनराई बंधारे बांधण्याचा जालीम उपाय सांगितला आहे. दरम्यान, आज कर्जत तालुक्यातील 123 नळपाणी बंद आहेत. त्यामुळे नदी-नाले कोरडे होत असताना वनराई बंधारे बांधून पुढील 6 महिन्यांच्या पाणी संकटावर ही मलमपट्टी यशस्वी ठरेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जत तहसील कार्यालयात नुकतीच संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, पंचायत समिती सभापती नमिता घारे, नगराध्यक्ष पुष्पा दगडे, पंचायत समिती उप सभापती चित्रा ठाकरे, उप नगराध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी, पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता तालुक्यातील सर्व 55 ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्याच्या सूचना आमदार थोरवे यांनी दिल्या. नद्या आणि ओढ्यांवर तात्पुरते बंधारे बांधून पाणी अडवल्यास विहिरीतील कूपनलिकांची पाणीपातळी टिकून राहील. या कामासाठी जेसीबी, साहित्य किंवा कोणताही निधी कमी पडल्यास आमदार निधी, सीएसआर आणि सरकारी निधीतून मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसह एमजीपी आणि जलजीवन मिशन अंतर्गत सर्व अपूर्ण योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. कंत्राटदारांच्या अडचणी दूर करण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक बोलावून कामाची प्रत्यक्ष पाहणी स्वतः करणार असल्याचे आमदार थोरवे यांनी स्पष्ट केले. दर 10 दिवसांनी टंचाई निवारण कामांचा आढावा घेण्याचे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. परंतु, आज कर्जत तालुक्यातील 123 नळपाणी बंद आहेत. त्यामुळे नदी-नाले कोरडे होत असताना वनराई बंधारे बांधून पुढील 6 महिन्यांच्या पाणी संकटावर ही मलमपट्टी यशस्वी ठरेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच, पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्नही बैठकीत महत्त्वाचा ठरला. मका बियाण्यांची उपलब्धता, चारा उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना आणि आगामी टंचाईच्या काळात जनावरांना चारा उपलब्ध होईल, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी खालावत असल्याने लोकसहभागातून वनराई बंधारे उभारणे, अपूर्ण बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करणे, गाळ काढणे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीसाठा वाढविण्यावर भर देण्यात आला.

जलजीवनचे तीनतेरा
कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत एकूण 123 पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 78 योजना एनजेएस आणि 45 योजना नाबार्ड यांच्यामार्फत राबविण्यात येत आहेत. मात्र, या सर्व नळपाणी योजना अपूर्णावस्थेत आहेत आणि त्यामुळे पुढील 6 महिने पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होणार असल्याचे बोलले जात आहे.
Exit mobile version