आमदारांच्या फोनवर दोघांना पोलिसांनी सोडल्याची चर्चा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग पोलिसांनी शनिवारी पहाटे गुटखा विक्रीवर छापा टाकला. यामध्ये तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र आमदारांच्या फोननंतर अलिबाग पोलिसांनी अर्थपुर्ण सहकार्यातून दोघांची सुटका केली असून पान टपरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची चर्चा जोरात सुुरू आहे. गुटखा कारवाईत पान टपरीवाल्याला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग पोलीसांविरोधात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक किशोर साळे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आंचल दलाल यांनी पोलीस अधीक्षक म्हणून कारभार हाती घेतल्यावर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मोहिम हाती घेतली. जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका जुगार व इतर अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी तंबी प्रभारी अधिकारी यांना देण्यात आल्या. त्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस ठाणे स्तरावर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या दणक्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली. मात्र आजही जिल्ह्यातील अनेक भागात मटका, जुगार आदी धंदे छुप्या पध्दतीने चालत आहे. वीस रुपयांचा गुटखा 35 ते 40 रुपये दराने विकला जात आहे. ही बाब स्थानिक पोलिसांना माहित असतानाही त्यांच्यावर मात्र कारवाई करीत नसल्याची चर्चा आहे.
अलिबाग पोलीस ठाण्यापासून तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या भालफाटा येथे अलिबाग पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 33 हजार 133 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये केशरयुक्त विमल पानमसाला, तंबाखूचे एकूण 120 हून अधिक पाकीटे आणि दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईलचा समावेश आहे. या कारवाईत सुरुवातीला तिघांना ताब्यात घेण्यात आले.त्यामध्ये पुकले नामक दोन व्यक्ती आणि मोरे नामक एक व्यक्तीचा समावेश होता. परंतु आमदारांचा फोन गेल्यावर पुकले नामक दोन व्यक्तींना सोडून पान टपरीवाला राजू तथा राजेश मोरे याला बळीचा बकरा करीत त्याच्याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. पोलिसांची ही कारवाई कौतूस्पाद असली, तरी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अर्थपूर्ण सहकार्यातून राजकीय दबावाखाली येऊन गुन्हेगारांना सोडून दिल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत नाराजीचे सुर उमटले जात आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
गुटख्याचे धागेदोरे नागोठण्यात
वाघोली येथील एक इसम नागोठणे येथून कल्पेश चौधरी आणि ओमप्रकाश मोदी यांच्याकडून गुटखा आणतो. त्यानंतर अलिबाग व इतर परिसरात तो गुटखा वितरीत करतो, असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. नागोठणेमध्ये गुटखा विक्रीचे धागेदोरे असतानाही स्थानिक पोलीस याबाबत अनभिज्ञ का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नागोठणे पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजीचे सुर उमटत आहेत.
