गतविजेती खेळाडूला धुळ चारली
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जागतिक कुस्ती स्पर्धेत तपस्याने सुवर्णपदक पटकावले. भारतासाठी हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. अंतिम फेरीत तपस्याने नॉर्वेच्या दोमाजेवाला पराभूत केले, तर उपांत्य फेरीत गतविजेतीला धुळ चारली. तपस्याने जागतिक वीस वर्षाखालील कुस्ती स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले. तिने सामाकोवा (बल्गेरिया) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या 57 किलो गटात ही कामगिरी केली. तपस्याने निर्णायक लढतीत नॉर्वेच्या फेलिसितास दोमाजेवाचा 5-2 असा पराभव केला. तपस्याने उपांत्य फेरीत गतविजेत्या सोमाका उचिदा हिला हरवून आपण सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले होते. तेच नेमके साध्य करताना तिने अंतिम सामन्यांत मोक्याच्यावेळी गुण जिंकले.
प्रिया, रीना अंतिम फेरीत
प्रिया मलिक आणि रीनाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. वयोगटाच्या स्पर्धेत प्रियाने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. तिने 76 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या एवलिन उझेलजीला अवघ्या तीन मिनिटांत चीतपट करून 10-0 असा विजय मिळवला. प्रियाने याच वजनी गटात ज्युनिअर स्पर्धेत विजेतेपद जिंकले आहे. प्रियाने रशियाच्या डायना तितोवाला 4-0 असे एकतर्फी लढतीत हरवले होते.
आशियाई 23 वर्षाखालील आणि तसेच ज्युनियर गटातील विजेत्या रिनाने धडाका जागतिक स्पर्धेतही कायम ठेवला आहे. तिने 55 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्य फेरीत रुमानियाच्या अलेक्झांड्रा वॉईकुलेस्कू हीला एकतर्फी लढतीत 11-1 असे हरवले. तिने यापूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत गतस्पर्धेतील उपविजेत्या खालिऊन ब्यामबासुरेन (मंगोलिया) हिला 11-6 असे हरवले होते. रिनाने 0-4 पिछाडीनंतर प्रतिस्पर्धीस चीतपट केले होते.
