महाराष्ट्राच्या साईनाथचे प्रभावी यश
। पालघर । प्रतिनिधी ।
वाडा-मनोर या रस्त्यापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी गोर्हे नावाचे आदीवासी गाव आहे. याच गावातील साईनाथ मोहन पारधी याने 17 वर्षांखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 51 किलो गटात कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
ग्रीको रोमन विभागात भारतीय कुस्तीगिरांना क्वचितच यश मिळते. यात साईनाथने प्रभावी यश मिळवले आहे. त्याने कझाकस्तानच्या येरासी मुसान याचा 3-1 असा पराभव करून तिसरा क्रमांक टिकावला आहे. खरे तर साईनाथ हा तुरान दाश्दामिरोव याच्याविरुद्ध पहिल्या फेरीत 1-5 असा पराभूत झाला होता. मात्र, तुरानने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे साईनाथला रिपेचेजद्वारे संधी मिळाली. साईनाथने रिपेचेजमध्ये अमेरिकेच्या डॉमेनिक मिचेल मुनार्तेओ याला 7-1 असे हरवले. यावेळी त्याने एकतर्फी वर्चस्व राखले होते. त्याची कांस्यपदकासाठी लढत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या येरासीविरुद्ध झाली. त्यात साईनाथने बाजी मारली.
साईनाथचे हे यश स्वप्नवतच आहे. त्याने सुरुवातीला भाईंदर येथील गणेश आखाडा कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेतले होते. त्याच वेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवावे, या उद्देशातून ‘मिशन ऑलिंपिक’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेतील कुस्तीगिरांची निवड करण्यासाठी 2021च्या जानेवारीत पुण्यातील जाणता राजा कुस्ती केंद्रावर राज्यातील 15 वर्षांखालील कुस्तीगिरांसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. यात 166 कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. त्यातून 10 कुस्तीगिरांची निवड करण्यात आली होती. निवडलेल्या कुस्तीगिरांचा सर्व खर्च भोंडवे अध्यक्ष असलेली ‘ड्रीम फाउंडेशन जाणता राजा कुस्ती केंद्र’ करत आहे.
या निवड चाचणीतून साईनाथची 42 किलो फ्रीस्टाईल विभागात निवड झाली होती. मात्र, त्याचा सुमारे एका वर्षाचा सराव पाहून त्याला ग्रिको रोमनमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून त्याचा ग्रिको रोमनचा सराव सुरू झाला. जाणता राजा कुस्ती केंद्रात येण्यापूर्वी तो कोणतीही स्पर्धा खेळला नव्हता. मात्र, त्याने पदार्पणाच्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकून जोरदार सुरुवात केली आहे. यामुळे आता साईनाथकडून भविष्यातील आशा वाढलेल्या आहेत.