। सिद्धी भगत ।
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम महाराज यांनी प्राणपणाने केले. संभाजी राजे यांची तर औरंगजेबाने तुळापूर येथे निर्घृण हत्याही केली. त्यांच्या पश्चात या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्त्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी. ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या. शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी राजाराम आणि ताराऊ यांचा विवाह लावून दिला होता. अत्यंत धाडसी, चाणाक्ष अशी ताराऊ यांची ख्याती होती. त्यांचे जीवनही संघर्षमय असेच होते. त्यांच्या जीवनावर आधारित असा छत्रपती ताराराणी हा सिनेमा प्रदर्शित होत असून, विशेष म्हणजे हा संपूर्ण सिनेमा मराठी,हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. सोनाली कुलकर्णी छत्रपती ताराराणी या सिनेमातून छत्रपती ताराराणींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी सोनालीने या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत मराठी प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. छत्रपती ताराराणी हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ताराराणीने त्या वेळेच्या जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरुद्ध निकराचा लढा दिला होता. अशा या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणार्या छत्रपती ताराराणींवर आधारित छत्रपती ताराराणी हा सिनेमा आहे. हा सिनेमा 2022 च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे.