| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील शेतकरी शेतीसाठी मोठी कर्जे घेत नाहीत. त्यांच्यासाठी अल्प मुदतीची किसान क्रेडिट कर्जे फायद्याची ठरत आहेत. रायगड जिल्ह्याला 450 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी जास्तीत जास्त किसान क्रेडिट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. योजनेतील नामंजूर झालेल्या अर्जांचे परत एकदा अवलोकन करून जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर करावेत, यासाठी बँकांनी आणि जिल्हा उद्योग केंद्रांनी समन्वयाने शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात झाली.
जिल्ह्याला सप्टेंबर अखेर प्राथमिकता क्षेत्रासाठी पाच हजार 275 कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट असताना बँकांकडून पाच हजार 682 कोटी (109 टक्के) कर्ज वाटप झाले आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी असणारे 450 कोटींचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा, असे आवाहन त्यांनी केले. मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसायांतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या. बँकांनी व शासकीय अधिकार्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्यावी तसेच शासकीय योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावावी, अशा सूचना केल्या. जास्त व्याज घेणार्या संस्थांमधून कर्ज न घेता सरकारी बँकांमधून घ्यावे तसेच बनावट नोटा ओळखणे व नाण्यांच्या वापरासंबंधी जिल्ह्यात जनजागृती व्हावी, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जावळे यांनी दिले.
पीक कर्जासाठी 450 कोटींचे उद्दिष्ट
सप्टेंबर 2024 पर्यंत कृषी क्षेत्रासाठी एक हजार 95 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना बँकांनी एक हजार 58 कोटी (97 टक्के) तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी 3,304 कोटींचे उद्दिष्ट असताना 3,552 रुपये (108 टक्के) तर पीक कर्जासाठी 450 कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय कुलकर्णी यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याच्या सप्टेंबर 2024 अखेरच्या प्रगती अहवालाची माहिती दिली. त्याचबरोबर मुद्रा अंतर्गत जिल्ह्यामध्ये 334 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगितले.