दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर बर्ड फ्लू सर्वेक्षण क्षेत्र
| रायगड । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथे परसदारातील कुक्कुट पक्षांचा मृत्यू आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळा, भोपाळ मध्य प्रदेश येथे रोग निदानास्तव पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेने कुक्कुट पक्षांचा मृत्यू एव्हियन इन्फ्लुएंझा, बर्ड् फ्लू या रोगासाठी होकारार्थी आल्याचे कळवले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोग प्रतिबंधक अधिनियम 2009 व बर्ड फ्लू रोगप्रसार रोखण्यासाठीचा भारत सरकारचा सुधारित कृती आराखडा 2021 मधील तरतुदीनुसार माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी चिरनेर येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
बाधित क्षेत्रातील निरोगी दिसणारे पाळीव पक्षी, पक्षांचे मांस, अंडी, विस्टा, तूस, भुसा इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत. बाधित क्षेत्रातून मृत व जिवंत पक्षी, खाद्य, मांस, विस्टा, उपकरणे इत्यादींची वाहतूक करण्यास दिनांक 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत मनाई करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वनविभाग, परिवहन इत्यादी विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. सदर रोगस्थिती नियंत्रणात असून कुक्कुट व्यवसायिक व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगणेबाबत पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे .