अनधिकृत बांधकामाला ताडपत्रीचा आडोसा

अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाईच नाही
| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायतमधील रस्त्याच्याकडेला अनधिकृत बांधकाम केले जात आहे. त्या बांधकामाला स्थानिक विरोध करून तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, संबंधित बांधकाम करणार्‍या व्यक्तीवर नेरळ विकास प्राधिकरणकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचना नेरळ पोलिसांना केल्या होत्या. मात्र या बांधकामाला नेरळ ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे काय? असा प्रश्‍न स्थानिकांना पडला आहे.

शहरीकरणाकडे झुकलेल्या नेरळ, ममदापुर आणि कोल्हारे ग्रामपंचायतमधील भागाचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी नगररचना विभागाच्या आदेशाने नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले आहे. नेरळ ग्रामपन्चायत मधील राज्यमार्ग आणि नगररचना विभागाने नियोजित केलेल्या रस्त्यांच्या कडेला नेरळ जकात नाका समोर दुकानाचे गाळे बांधले जात आहेत. त्या इमारतींबद्दल तेथील स्थानिकांनी नेरळ विकास प्राधिकरणकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नेरळ प्राधिकरणाचे शाखा अभियंता सचिन जगताप यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. त्यातून नेरळ विकास प्राधिकरणकडून नेरळ ग्रामपंचायतला पत्र देऊन सदर बांधकाम रस्त्याच्या जागेत आहे असे नमूद केले होते. ते बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे आणि बांधकाम करणारे यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे आदेश नेरळ विकास प्राधिकरणाकडून ग्रामपंचायतीला दिले होते.

मात्र तक्रारी होऊन आणि गुन्हे दाखल होऊन देखील संबंधित बांधकाम पाडले गेले नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना बळ मिळत असून त्या ठिकाणी ताडपत्री बांधून बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या बांधकामाला नेरळ ग्रामपंचायत कडून पाठिंबा आहे की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Exit mobile version