तटकरे पॉलिटेक्निक गोवेचा महाराष्ट्रात तृतीय क्रमांक

| कोलाड | प्रतिनिधी |

श्रीमती. गीता द.तटकरे पॉलिटेक्निक, गोवे कोलाड या संस्थेने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आयोजित इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पोर्ट्स जनरल चॅम्पियनशिपमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी, त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी तसेच प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि क्रीडा समितीचे नियोजनबद्ध प्रयत्न यांमुळे संस्थेला हे यश प्राप्त झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेला इन्स्टिट्यूट परफॉर्मन्स थर्ड रँक हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने क्रीडा विभागप्रमुख प्रा.चैतन्य भगत आणि क्रीडा सचिव प्रा. मनीष पाटील यांनी गवर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे येथे हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त संदीप तटकरे, प्राचार्य विपुल मसाळ, रजिस्ट्रार व वर्चस्वचे सचिव अजित तेलंगे यांनी विद्यार्थी, प्रशिक्षक, क्रीडा समिती आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रातही संस्था सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Exit mobile version