भाजपासह धैर्यशिल पाटीलांना करावा लागतोय तटकरेंचा प्रचार
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभा मतदार संघातून तिकीट मिळवण्यासाठी भाजपाचे धैर्यशिल पाटील यांनी जंगजंग पछाडले होते मात्र, तटकरेंच्या राजकीय खेळी मुळे त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट भाजपासह त्यांना आता तटकरेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरावे लागले आहे. तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह पाटील हे जातीने हजर होते. तटकरेंनी भाजपासह धैर्यशिल पाटील यांचा चांगलाच गेम केल्याचे त्या निमीत्ताने अधोरेखित होते.
गेल्या एक-दीड वर्षापासून धैर्यशिल पाटील यांनी त्यांचे समर्थक हे रायगड लोकसभेच्या निवडणूकीकडे डोळे लावून बसले होते. रायगडमधून आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा वल्गना भाजपाच्या नेत्यांसह धैर्यशिल पाटील यांनी केल्या होत्या. सदरची जागा मिळावी यासाठी त्यांनी महायुतीत दबावतंत्राचा वापर सुरु केला होता. धैर्यशिल पाटील यांना भाजपामध्ये आणणार्यांनी पाटील यांच्यामध्ये हवा भरुन तुम्हीच खासदार होणार अशी न पूर्ण होणारी स्वप्न दाखवली. अखरे भाजपासह पाटील यांच्या भ्रमाचा भोपळा तटकरेंच्या जाहिर झालेल्या उमेदवारीने फुटला. तटकरेंनी भाजपाच्या वरिष्ठांना हाताशी घेत आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर पाटील हे काही कालावधीसाठी गायब झाल्याची चर्चा होती. अखेर वरिष्ठांच्या मनधरणीनंतर पाटील यांना महायुतीचे तटकरे यांच्या प्रचारासाठी बाहेर पडावे लागले आहे. गुरुवारी झालेलया जाहिर प्रचार सभेत भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण, पेणचे आमदार रविंद्र पाटील, स्वतः धैर्यशिल पाटील यांच्यावर तटकरेंसाठी मते मागण्याची नामुष्की ओढवल्याचे दिसून आले. काहीच दिवसांपूर्वी तटकरेंना आव्हान उभे करणार्यांनी आपापली तलवार म्यान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या नेत्याची राजकीय कारकिर्द धोक्यात आल्याची जाणीव पाटील यांच्या समर्थकांना वाटू लागल्याचे लागली आहे. त्यामुळे पुढे भविष्य काय असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला नसेल, तर नवलच म्हणावे लागेल.
तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत भाजपाच्या हातातून रायगड लोकसभेचे तिकटी गेले आहे. असे असले, तरी आता भाजपाचे नेते हे तटकरेंसाठी मत मागत आहेत. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत, यावरच ते स्वतःचे समाधान करुन घेत असल्याचे चित्र आहे. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत याच टॅग लाईनचा मुस्लिम समाजाने शिताफीने वापर केला आहे. तटकरेंना मत दिले तर ते भाजपाच्या मोदींना जाणार आहे. त्यामुळे तटकरेंना मतदान करु नका, असा उलटा प्रचार त्यांनी सुरु केला असल्याचे विविध समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या संदेशातून दिसून येते.