| उरण | वार्ताहर |
उरणमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने शाळेतील तिसरी व चौथी इयत्तेतील मुलींना अमानुष मारहाण करण्याची घटना सोमवारी (दि. 10) उघडकीस आली आहे. यामुळे समस्त पालकांच्या मनात धडकी भरली आहे. हे प्रकरण उरण पोलीस ठाण्यात गेले असता शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेऊन सामंजस्याने मिटविल्याची परिसरात चर्चा आहे. केंद्रप्रमुख अविनाश नवाळे यांनी अशी घटना घडल्याबाबत दुजोरा दिला आहे.
दरम्यान, शिक्षकाने शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीतील मुलींना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना दिलेला परिपाठ पूर्ण केला नाही. या रागातून त्याने शाळेतील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना अंगावर, गालावर लाल चट्टे उठेपर्यंत मारहाण केली. या प्रकाराने घाबरून जाऊन पीडित मुलींना आपले अश्रू अनावर झाले. त्या धाय मोकलून रडू लागल्या. या मारहाणीत तीन ते चार विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त बोरखार गावात पसरताच मुलांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात जमा होत शाळेला घेराव घातला. आक्रमक पालकांनी शिक्षकावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली.
पालक आक्रमक झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उसळलेले नागरिक पाहता शिक्षकाला पोलीस संरक्षणात चिरनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात जमा होत शिक्षकावर कारवाईची मागणी केली.
शिकक्षकांकडून विद्यार्थिनींवर अत्याचार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा घटनांमधील शिक्षकांवर कारवाई होऊनही हे प्रकार बंद होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. याला वेळीच आळा घातला नाहीतर भविष्यात पालक मुलींना शाळेत पाठविण्याबाबत विचार करतील, अशी चर्चा पालकवर्गात सुरू आहे.
शैक्षणिक कामानिमित्त मी आज बाहेर होतो. त्यामुळे नक्की काय प्रकार झालाय याबाबत माहिती नाही. विद्यार्थिनींना मारहाण झाल्याचे मला कळाले आहे. या घटनेचे मी समर्थन करणार नाही. अशा घटना यापुढे घडणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल.
अविनाश नवाळे,
मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख