शिक्षकांचे समुपदेशन थांबले

सविस्तर यादी तयार करण्याच्या सूचना

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 392 शिक्षकांचे समुपदेशन केले जाणार होते. परंतू हे समुपदेशन थांबविण्यात आले आहे. तुर्तास समुपदेशन थांबविले, असले तरी शिक्षकांना त्याचे कारण समजले नसल्याने शिक्षक संभ्रमात असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. याबाबत शिक्षकांनी दुपारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली.

जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील 392 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतू या बदल्यांवर 330 शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी बदल्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शाळा सुरु होऊन एक महिना झाला आहे. शाळांमध्ये शिक्षक अपुरे पडत आहेत. जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचे समोर आले आहे. तर काही शाळांमध्ये एकाच शिक्षक शाळेचा कारभार पाहत आहे. शाळांमध्ये शिक्षक अपुरे असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होण्याची भिती निर्माण झाली. त्यामुळे ग्रामविकास विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा मुद्दा घेत ग्रामविकास विभागाने शिक्षकांचे समुपदेशन करण्याचे पत्र जिल्हा परिषदेला दिले. त्यानुसार 392 शिक्षकांचे समुपदेशन बुधवार दि.12 जूलै रोजी करण्याची तयारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केली. मात्र समुपदेशनाला तुर्तास थांबविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या या कारभारामुळे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील शाळांमध्ये किती शिक्षक आहेत. याची सविस्तर माहिती घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. तुर्तास समुपदेशन थांबविले आहे. मात्र लवकरच शिक्षकांचे समुपदेशन केले जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत काळजी घेतली जाईल.

डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version