| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत रविवारी (दि.10) शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन केंद्रांवर परीक्षा पार पडेल. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.7) आढावा घेण्यात आला.
रायगड जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा पनवेल तालुक्यातील के.आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर विद्यालय या तीन केंद्रांवर पार पडेल. सदर परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. परीक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी आणि तेलगू माध्यमाचे परिक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.
गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.