शिक्षक निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर; विजेत्यांचा पैठणी देऊन गौरव

| वावोशी | वार्ताहर |

रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत पेण एज्युकेशन सोसायटीच्या मानसी मच्छिन्द्र केदारे यांनी खालापूर तालुक्यातून प्रथम तर रायगड जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांचा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

महिलांची शैक्षणिक क्षेत्रातील भरारी या विषयावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत संघटनेच्या तब्बल 340 महिला सभासदांनी सहभाग घेतला. या निबंध स्पर्धेतील पेपराची तपासणी विविध स्तरावर करून जिल्ह्यातून प्रथम पाच क्रमांकाचे मानकरी निवडण्यात आले. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना संघटनेच्या वतीने स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी पनवेल येथील के. वी. कन्या विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास गोविंद पाटील व शरद पाटील, संदीप कदम, सुधाकर जैवळ, नवनीत गावंड, यशवंत मोकल, हेमलता पाटील, वैशाली पाटील तसेच संघटनेचे सभासद अन्य शाळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version