शिक्षक सेवकांची सहकारी पतपेढी निवडणूक

‌‘सहकार’कडून परिवर्तन पॅनलचा पराभव

| माणगाव | प्रतिनिधी |

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतपेढी लि. माणगाव या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून विरोधी परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करीत सर्व 15 जागांवर देदीप्यमान विजय संपादन केला. यापैकी सत्ताधारी सहकार पॅनलची एक जागा अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून सचिन विठोबा गंगावणे हे बिनविरोध निवडून येऊन उर्वरित 14 जागांसाठी झालेल्या मतदानातून सहकार पॅनलचे सर्व उमेदवार दणदणीत मतांनी निवडून आले. या विजयाने सहकार पॅनलचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, विजयी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांचे आ. संजय केळकर यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले.

रा.जि.प. प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतपेढी लि. माणगाव पतसंस्थेच्या सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता सत्ताधारी सहकार पॅनलसोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ रायगड, महाराष्ट्र राज्य पदवीधर/केंद्र प्रमुख सभा, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या संघटना सहभागी झाल्या होत्या. यांच्याविरोधात परिवर्तन पॅनल निवडणूक रिंगणात होते. सहकार पॅनलकडून पॅनलप्रमुख म्हणून सेवानिवृत्त शिक्षक संजय निजापकर, सूर्यकांत करंजीकर, खलील बहुर, प्रकाश सुतार, उदय गायकवाड यांनी निवडणुकीची चांगली व्यूहरचना आखत आपले प्रचार प्रमुख व महिला आघाडी प्रमुख यांना सोबत घेत विरोधकांना धक्का दिला.

या निवडणूकिची मतदान प्रक्रिया संस्था कार्यालय माणगाव याठिकाणी रविवारी, (दि.25) सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत पोलीस बंदोबस्तात शांततेत व उत्साहात पार पडली. सायंकाळी 4.30 वाजल्यापासून संस्था कार्यालयात निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद शंकर वाघमारे (सहाय्यक निबंधक कार्यालय माणगाव) यांच्या अधिपत्याखाली मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी सहकार पॅनलने आघाडी घेत अडीच तास चाललेल्या या मतमोजणीत सर्व जागांवर सत्ताधारी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यामध्ये सहकार पॅनलमधून सर्व साधारण जागेतून परेश अंधेरे, मंगेश जाधव, रमेश उभारे, सतीश ढेपे, संदीप साळवी, संतोष मोहिते, राकेश मढवी, संदीप शिंदे, जयेंद्र वाघमारे, स्मिता पाबरेकर, महिला राखीव मतदार संघातून साधना करकरे, ज्योती दांडेकर, विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय मतदारसंघातून अंकुश महाडिक, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून संजय पाटोळे दणदणीत मतांनी विजयी झाले.

Exit mobile version