। माणगाव । प्रतिनिधी ।
राज्य शासनाने 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार यावर्षी केलेल्या संचमान्यतेमुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. या सुधारित संचमान्यता निकषाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने संच मान्यतेस विरोध केला असून, संच मान्यता जुन्या निकषानुसार करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शासनाला निवेदन देऊन केलेली आहे.
प्राथमिक शाळेचे संच मान्यता सध्या 2024 / 2025 च्या सुधारित निकषानुसार सुरू आहे. या संच मान्यतेमध्ये 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार झालेल्या बदलाच्या अनुषंगाने कारवाई करताना अनेक शिक्षकाचे रिक्त ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर 20 पेक्षा कमी पटसंख्या असणार्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकही शिक्षक मान्य होत नाही. परिणामी अनेक पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त ठरण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. तसेच, पूर्वी विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकसंख्या निर्धारित होती. आता मात्र नव्या निकषानुसार विद्यार्थी संख्या वाढविण्यात आली आहे. परिणामी अनेक शाळांना अपेक्षेपेक्षा कमी शिक्षक उपलब्ध होणार असल्याने राज्यात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.







