शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

रायगडातील गुरुजीही सहभागी
| पनवेल | वार्ताहर |
राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका मधील शिक्षकांच्या विविध समस्या कडे नगरविकास विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने शुक्रवारपासुन छेडलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला रायगड जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातून नपा मनपातिल शिक्षक सहभागी होत आहेत.दि.19 रोजी हे शिक्षक मुंबई आझाद मैदानांवर आंदोलनासाठी रवाना झाले.

राज्यभरातील जवळपास पाच हजार शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. रायगड मधील या शिक्षक संघाचे पदाधिकारी वैभव पाटील, ज्योत्सना भरडा, प्रमोद लांगी यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शिक्षक या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना शंभर वेतन मिळालाच पाहिजे, शिक्षकांना जुनी पेंशन लागू करावी, जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करावे, नगरविकास विभागाने नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करावा, शहर पातळीवर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यासारखी पदे निर्माण करून नपा व मनपाच्या शिक्षकांना पदोन्नती द्यावी आदी मागण्या या शिक्षक महासंघाने शासनाकडे केल्या आहेत.

शिक्षकांच्या मागण्यांबाबत आम्ही यापुर्वी मुख्यमंत्री, प्रधानसचिव यांच्यासोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र आमच्या मागण्या विचारात घेतल्या जात नसल्याने दि.20 रोजीचे लक्षवेधी धरणे आंदोलन शासनाला जाग आणण्यासाठी छेडले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी दिली. हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी होत आहेत.

Exit mobile version