शिक्षक करणार मतदानाचा जागर

। अलिबाग । वार्ताहर |

रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने वेगवेगळ्या उपक्रमांतून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्वीप उपक्रमांतर्गत गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत केंद्र प्रमुख साधन व्यक्तींना मार्गदर्शन केले जात आहे. मतदानाच्या माध्यमातून देशाची लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड या चार विधानसभा तसेच गुहागर दापोली या रत्नागिरीतील दोन विधानसभांचा समावेश आहे. या मतदार संघात 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष आठ लाख 13 हजार 515, महिला आठ लाख 40 हजार 416, तृतीय पंथी चार, दिव्यांग आठ हजार 46, 85 वयोगटापेक्षा 31 हजार 28 तर 18 ते 19 वयोगटातील 16 हजार 288 मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल असून अर्जाची छाननी 20 एप्रिल रोजी केली जाणार आहे. अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया 22 एप्रिल रोजी असणार आहे.रायगड लोकसभा मतदार संघात दोन हजार 185 मतदान केंद्र आहेत. त्यात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मतदान सात मे रोजी होणार असून मतमोजणी चार जूनला होणार आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, शिक्षण साधन व्यक्ती यांची स्वीप उपक्रमांतर्गत बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम गट शिक्षणाधिकार्‍यांमार्फत करण्यात आले आहे. अलिबागमधील गट शिक्षणाधिकारी यांनी केंद्र प्रमुख व साधन व्यक्ती, शिक्षण साधन व्यक्ती यांची पंचायत समितीच्या कार्यालयात बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदारामध्ये मतदान करण्यासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. त्यामध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, रॅली काढणे, पथनाट्य घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय हक्क बजावणे, मतदानाच्या माध्यमातून देशाची लोकशाही बळकट करणे. शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदारांना, आपल्या पालकांना मतदान करण्यास सांगावे, गावातील सर्व मतदारांनी मतदान करावे. वृद्ध असो की तरुण मतदारांनी मतदान करावे. मतदान करून मतदानाचे करा दान अशा प्रकारचा संदेश देखील मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात असे सांगण्यात आले.

Exit mobile version