टीम इंडियाला मिळणार परदेशी प्रशिक्षक

अनिल कुंबळे शर्यतीतून बाहेर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमियर लीग 2021 स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा भारतीय संघासाठी आणि रवी शास्त्रीसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण या स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय सध्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. रवी शास्त्रीनंतर या पदासाठी माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे होते. परंतु आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. स्वतः अनिल कुंबळे हे पद स्वीकारण्यासाठी इच्छुक नाहीत. तसेच बीसीसीआयच्या काही सदस्यांनी देखील त्यांना पुन्हा प्रशिक्षक बनवण्यासाठी रस दाखवला नाही. त्यामुळे बीसीसीआय परदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यापूर्वी ग्रेग चॅपेल हे परदेशी प्रशिक्षक भारतीय संघाला लाभले होते.मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुंबळे यांना माहीत आहे की, प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा विराट कोहली आणि इतर खेळाडूंसोबत काम करावे लागेल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षकपद देण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु इतर सदस्य सहमत नसल्याचे पाहायला मिळाले. यासह व्हीव्हीएस लक्ष्मणची देखील प्रशिक्षक म्हणून निवड करणे कठीण आहे. म्हणून बीसीसीआय सध्या परदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. परंतु या निर्णयास अजूनही बराच वेळ आहे, येणार्‍या काळात याबाबत निर्णय घेतला जाईल.


Exit mobile version