टीम इंडियाचा विंडीजला व्हाईट वॉश

तिसर्‍या सामन्यासह मालिकाही जिंकली
। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।

मुंबईकर श्रेयस अय्यर (111 चेंडूंत 80 धावा), यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (54 चेंडूंत 56) यांची अर्धशतके आणि गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारताने तिसर्‍या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजला 96 धावांनी धूळ चारली. भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.फ सामनावीर म्हणून श्रेयस अय्यर तर मालिकावीर प्रसिध कृष्णा यांचा सन्मान करण्यात आला.
भारताने दिलेल्या 266 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा डाव 37.1 षटकांत 169 धावांत आटोपला. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. भारताने विंडीजविरुद्ध प्रथमच एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आला. कर्णधार रोहित शर्मा (13), विराट कोहली (0) यांना अल्झारी जोसेफने चौथ्याच षटकात माघारी पाठवले. तर अनुभवी धवनसुद्धा (10) 10व्या षटकात बाद झाला. 3 बाद 42 धावांवरून अय्यर आणि पंत यांनी चौथ्या गडयासाठी 110 धावांची भागीदारी रचली. अय्यरने नववे, तर पंतने पाचवे अर्धशतक झळकावले. हेडन वॉल्शने पंतला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही (6) स्वस्तात परतला.
त्यामुळे अय्यरवरील दडपणात वाढ झाली आणि तोसुद्धा मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉल्शच्या गोलंदाजीवर बाद झाला. मग सुंदर आणि चहर यांनी सातव्या गडयासाठी 53 धावांची भर घालून भारताला अडीचशे धावांपलीकडे नेले. जेसन होल्डरने मोहम्मद सिराजचा त्रिफळा उडवून भारताचा डाव 50 षटकांत 265 धावांवर गुंडाळला.
लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने सातत्याने बळी गमावले. 8 बाद 122 धावांवरून हेडन वॉल्श (13) आणि जोसेफ यांनी 47 धावांची भागीदारी करून भारताला झुंजवले. मात्र त्यांना विजयीरेषा ओलांडता आली नाही. कृष्णाने जोसेफला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
भारत : 50 षटकांत सर्व बाद 265 (श्रेयस अय्यर 80, ऋषभ पंत 56; जेसन होल्डर 4/34) विजयी वि. वेस्ट इंडिज : 37.1 षटकांत सर्व बाद 169 (ओडेन स्मिथ 36; प्रसिध कृष्णा 3/27, मोहम्मद सिराज 3/29)

राहुल, अक्षर ट्वेन्टी-20 ला मुकणार
भारताचा उपकर्णधार के. एल. राहुल आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल वेस्ट इंडिजविरुद्ध 16 फेब्रुवारीपासून रंगणार्‍या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेला मुकणार आहे. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात राहुलच्या मांडीचा स्नायू दुखावला, तर अक्षर सध्या करोनातून सावरत आहे. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला आहे.

Exit mobile version