माझा गाव शोधू कुठे! तळीयेत आक्रोश अन् किंकाळ्या…

माहेरवाशीणींनी फोडला हंबरडा
। महाड, तळीये । भारत रांजणकर ।

माझा गाव कुठे शोधू… माझा बाप कुठे हाय, शाळेजवळ माझी वाट बघत असेल काय, माझी भाची गेली कुठे, माझा चुलता भेटेल का, असे एक ना अनेक प्रश्‍न आणि आक्रोशांनी तळीये गाव हादरला आहे.

गुरूवारी सायंकाळी कोसळलेल्या दरडीखाली गायब झालेल्या ग्रामस्थांच्या लेकी, मुली दुर्घटना समजल्यानंतर आल्यावर आकाशालाही पाझर फुटेल, अशा स्वरात हंबरडा फोडत रडत असल्याचे पाहून मन सुन्न झाले. 84 ग्रामस्थ गावात होते. 4 च्या सुमारास दरड कोसळण्यास सुरूवात होताच ग्रामस्थ एका घराच्या अंगणात येवून थांबले होते. आपला संसार डोंगर गिळणार या कल्पनेने गावातून पाय देखील निघत नव्हता. पण पाठीमागे मृत्यू दिसत असल्याने पळायच्या तयारीत असणार्‍या अबालवृद्ध, महिलाव पुरुष यांना डोंगराने आपल्या मगर मिठीत ओढले. क्षणार्धात नांदत असलेला तळीये गाव डोंगराच्या ढिगार्‍याखाली गायब झाला.

किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला. नोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर असलेल्या चाकरमान्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावावर कोसळलेल्या संकटाची कल्पना येताच आपल्या घरच्यांच्या काळजीने जो तो गावाकडे जाण्यास सुरू झाले. पण माणगावपर्यंत पुराच्या पाण्याने रस्ते अडकल्याने पुढे जाता येईना. पाणी ओसरण्याची वाट पाहत शेवटी घराकडे धाव घेतली. कसाबसा रस्ता तुडवीत पोहचलेल्या डोळ्यांना आपले गाव, वाडी घरे शोधूनही सापडली नाही. पळत सुटलेल्या 22 जणांना सोबत घेवून गेलेला डोंगर…बौद्ध वाडीमध्ये थेट मृतदेहच हाती आले. एवढा मोठा 32 घरांचे गावच्या गाव मातीच्या ढिगार्‍याखाली नाहीसे झाले.

Exit mobile version