| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील चिचोंडे आदिवासी वाडी येथील नरेश जाधव याने तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा निर्माण केली आहे. केवळ कष्ट करण्याची तयारी असून चालत नाही, तर त्याला जेव्हा योग्य कौशल्याची जोड मिळते, तेव्हा प्रगतीची दारे कशी उघडतात, हे नरेशने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. त्याने तांत्रिक कौशल्याचा प्रवास 2021-22 मध्ये सुरू केला आणि स्वदेस फाउंडेशन मार्फत आयोजित हेल्पर मेसन (बांधकाम सहाय्यक) या ट्रेडचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यावर त्याची शिकण्याची ओढ न थांबता त्याने बांधकामातील बारकावे आणि प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी 2023-24 मध्ये आरसीसी बांधकामाचे प्रशिक्षणही पूर्ण केले. स्वदेस फाऊंडेशनमार्फत मिळालेल्या या दर्जेदार प्रशिक्षणामुळे नरेशला बांधकामातील तांत्रिक गोष्टींचे सखोल ज्ञान मिळाले. यापूर्वी मजुरी करणाऱ्या नरेशकडे आता तांत्रिक ज्ञानाची शिदोरी होती, त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला. त्याची ही भरारी, जिद्द आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून संस्थेने त्याला लर्नेट प्रशिक्षक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी सोपवली आहे. सध्या तो कुडतुडी आदिवासी वाडी येथील हेल्पर मेसन बॅचमधील तरुणांना मार्गदर्शन करत आहे.







