| खांदेश्वर | प्रतिनिधी |
कृषी महोत्सवातून तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असल्याचे प्रतिपादन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले. कृषी विभाग व आत्मा रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या कृषी महोत्सवास कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी भेट देऊन शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
चव्हाण यांनी महोत्सवास सपत्नीक भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी त्यांचे स्वागत केले. कृषी आयुक्त श्री. चव्हाण यांनी कृषी विभागाच्या दालनामधील जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण कृषी उत्पादनाच्या नमुन्यांची त्याचप्रमाणे विभागाने केलेले तयार केलेल्या पौष्टिक तृणधान्य दालनातील कृषी विभागाच्या जिल्ह्यातील महिला अधिकारी-कर्मचार्यांनी तयार करून आणलेल्या पौष्टिक तृणधान्यांच्या विविध स्टॉललाही भेट दिली. यावेळी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोडबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर त्यांनी सर्व स्टॉलची पाहणी करीत शेतकरी व महिला बचतगटातील सदस्यांना पॅकिंग व ब्रॅण्डिंग वर लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री स्टॉलला भेट देऊन तृणधान्य खाण्याची शारीरिक गरज असून परंपरेनुसार चालत आलेली नाचणी, वरी, बाजरी यांचे आहारातील प्रमाण निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी आयुक्त यांच्या हस्ते पी.एम.एफ.एम.एम.ई. स्मार्ट अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी व भात पीक स्पर्धा या योजनेतील लाभार्थी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले आणि कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे कृषी महोत्सवाबाबत अभिनंदन करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीबाबत शेतकर्यांना मिळणार्या मार्केट व दराबाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.